प्रसेनजीत इंगळे

विरार : श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत, त्यात आता १५ दिवसापूर्वी वसई सोडून स्थलांतर झालेले आफताबचे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याची माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली आहे. यामुळे आफताबच्या कृत्याची माहिती त्याच्या कुटुंबाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

श्रद्धा बेपत्ता असल्याचा माणिकपूर पोलीस शोध घेत असताना २६ ऑक्टोंबर रोजी पोलिसांनी प्रथम आफताब आणि त्याच्या घरच्यांची चौकशी केली होती. ही चौकशी केवळ मौखिक होती. यावेळी श्रद्धा आपल्याशी भांडण करून निघून गेल्याचे आफताबने पोलिसांना सांगितले होते. यानंतर तो वसईच्या आपल्या घरी गेला होता. त्या नंतरच त्याच्या घरच्या मंडळीने स्थलांतराची सुरुवात केली असल्याचे समजत आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी माणिकपूर पोलिसांनी आफताबचा लेखी जबाब नोंदवला. यावेळी पोलिसांनी त्याचे आणि श्रद्धाच्या बँकेच्या खात्याची माहिती आणि मोबाइल फोनचे सर्व तपशील त्याच्या समोर ठेवले. त्या दिवसापासून आफताबचे कुटुंब संपर्काबाहेर आहे.

आफताबचे वडील ज्या ठिकाणी राहत होते, त्या गृहसंकुलाचे सरचिटणीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आफताबच्या लहान भावाची मुंबईला नोकरी लागली आणि त्याला जाण्यायेण्याला त्रास होत असल्याने ते मीरा रोड परिसरात जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. याबाबत मीरा रोड परिसरातील काशिमीरा आणि नयानगर पोलीस ठाण्याच चौकशी केली असता अमीन पूनावाला नावाची व्यक्ती त्यांच्या परिसरात राहत नसल्याचे सांगितले. यामुळे आफताबच्या कृत्याची माहिती मिळताच त्याचे कुटुंब अज्ञातस्थळी गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हत्येच्या दिवशी श्रद्धाच्या खात्यातून ५० हजार रुपये वळते..

आफताब ने १८ मे रोजी श्रद्धाची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर १८ दिवस तो तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीत वेगवेगळय़ा ठिकाणी फेकत होता. पण ज्या दिवशी श्रद्धाची हत्या केली त्याच दिवसी तिच्या बॅंकेच्या खात्यातून ५० हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग केले होते. त्यानंतर २२ ते २६ मे पर्यंत तो एक हजार ते दोन हजार रुपये श्रद्धाच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने काढत होता. पोलिसांनी असाही संशय व्यक्त केला आहे की, हत्येनंतर तिच्याच पैशाने त्याने फ्रीज, मृतदेह कापण्याचे हत्यार, घरात साफसफाईसाठी लागणारे साहित्य खरेदी केले असावे. पण या बाबत अद्याप कोणतीही पुष्टी दिली नाही.

Story img Loader