वसई: श्रध्दा वालकरचे वडील विकास वालकर यांनी वसई पोलिसांवर आरोप केलेले आरोप पोलिसांनी फेटाळले आहे. वसई पोलिसांनी योग्य तपास केला असता तर श्रध्दा वाचली असती असा आऱोप वालकर यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. श्रध्दा वालकरची हत्येने देशात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रथमच श्रध्दाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत या विषयावर भाष्य केले. श्रध्दाने २०१९ मध्ये तुळींज पोलीस ठाण्यात जीवाला धोका असल्याची तक्रारीची दखल घेतली नाही तसेच माणिकूपर पोलिसांनी ती बेपत्ता असल्याचा योग्य तपास केला नाही असे आरोप त्यांनी केले. वालकर यांनी केलेल्या आरोपामुळे वसई पोलिसांना धक्का बसला आहे.
आफताबने १८ मे २०२२ रोजी दिल्ली येथे केली होती. ऑक्टोबर महिन्यात तिचे वडील विकास वालकर श्रध्दा बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन तत्कालीन उपायुक्त संजयकुमार पाटील यांना भेटले होते. पाटील यांनी गांभिर्य दाखवून या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे सोपवला होता. पोलिसांनी आफताबची चौकशी केली, त्याच्या दाव्यांची सत्यता पडताळण्यााठी तांत्रिक विश्लेषण करून तपास केला. यानंतर माणिकपूर पोलीस नवी दिल्लीत ५ दिवस तळ ठोकून होते. माणिकपूर पोलिसांनी केलेल्या तपासामुळेच श्रध्दाच्या हत्येचा उलगडा झाला होता. अशावेळी पोलिसांनी योग्य तपास न केल्याचा आरोप निराधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुळींज पोलीस ठाण्यात श्रध्दाने आफताब विरोधात अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी २६ दिवस चौकशी केली. शेवटी श्रध्दाने माघार घेतल्याने अर्ज निकाली काढला होता, असेही पोलिसांनी सांगितले. आमचा तपास आणि श्रध्दाच्या अर्जावर केलेली कारवाई योग्य होती. कुठेही हलगर्जीपणा झाला नाही. त्यामुळे वालकर यांनी केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत, असे वसईचे तत्कालीन पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले.