लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : वसई पश्चिमेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. वाढत्या संख्येमुळे या रुग्णालयात आणखीन नवीन ७० खाटांची क्षमता वाढविली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी एकूण १४० खाटा इतकी होणार आहे.
वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होऊ लागले आहे.त्यामुळे शहराची लोकसंख्या ही भरमसाठ वाढली आहे. लोकसंख्येच्या मानाने शहरात आरोग्य सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
सध्या शहरात पालिकेची ९ रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३६ आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत. त्यातून शहरातील नागरिकांना वैद्यकीय आरोग्य सेवा पुरविली जात आहे. मागील काही वर्षांपासून वसई विरार महापालिकेने शहरातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्यावर भर दिला आहे. शहरात विविध प्रकारच्या आरोग्य सेवा रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने वसई पारनाका येथे असलेल्या सर डी एम पेटिट रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सर डी एम पेटिट रुग्णालय पालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे रुग्णालय समजले जात आहे.
या रुग्णालयात विविध व्याधींवर उपचार घेण्यासाठी रुग्ण यायचे. आरोग्य तपासणी, एक्स रे, गर्भवती महिलांच्या प्रसूतीपासून ते रक्त तपासणीपर्यंत सर्वच महत्त्वाची आरोग्यसेवा येथे देण्यात येत आहे. त्यामुळे वसई गावातील हे पालिकेचे एकमेव रुग्णालय सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरत आहे. मात्र दिवसेंदिवस या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे आता रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात येणार असून त्यांची संख्या दुप्पट केली जाणार आहे.
आता ७० खाटा असून अजून नवीन ७० खाटा त्याठिकाणी उपलब्ध केल्या जाणार असल्याने रुग्णालयाच्या खाटांची १४० एवढी होणार आहे. याशिवाय इतर ही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत असे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी सांगितले आहे.
चोवीस तास आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न
सर डी एम पेटिट रुग्णालयात शहरातील नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः काही रुग्ण रात्री अपरात्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. यासाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या रुग्णालयातच डॉक्टर निवासाची सुद्धा व्यवस्था केली जाईल जेणे डॉक्टर त्या ठिकाणी राहून रुग्णांना चांगली सेवा देता येईल असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.
पालिकेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात खाटांचीसंख्या वाढविली जाणार आहे. ७० नवीन खाटा त्या ठिकाणी उपलब्ध होतील लवकरच त्यांचे लोकार्पण केले जाईल. -अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका