विरार : वसई विरार महानगरपालिका आपल्या संकेतस्थळाचा लवकरच कायापालट करणार आहे. संकेतस्थळ अद्ययावत आणि सोपे केले आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय पालिका लवकरच आपले उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) तयार करणार आहे. यामुळे नागरिकांना पालिकेच्या विविध सेवा वापरताना सोयीचे होणार आहे. सध्याच्या आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळ असणे महत्त्वाचे आहे. पण वसई विरार महानगर पालिकेच्या संकेतस्थळात अनेक त्रुटी आणि अद्ययावत माहिती नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी पालिकेने संकेतस्थळ अद्ययावत करावे, अशी मागणी अनेक महिन्यांपासून होत होती.

या मागणीच्या आधारे पालिकेने आता आपल्या  संकेतस्थळाचा कायापालट करत लोकाभिमुख बनविले आहे. त्याच या संकेतस्थळावर सर्व प्रभागांची आणि मुख्यालयाची माहिती उपलब्ध केली आहे. तसेच इतर नागरी सुविधांची माहिती दर्शनीभागी दिली आहे. तसेच कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संकेतस्थळ स्थळाचे वैशिष्टे म्हणजे दुसऱ्या लाटेत रुग्णांना रुग्णालयाची माहिती मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागला होता. यामुळे पालिकेने संकेतस्थळावर यावेळी दर्शनीभागी ही माहिती उपलब्ध केली आहे. यात रुग्णालय आणि खाटांची माहिती उपलब्ध केली आहे. तसेच नियमित करोना  रुग्णांची संख्यासुद्धा दिली जात आहे.  पालिकेच्या संकेतस्थळाचा  झालेला कायापालट नागरिकांसाठी मोठा सोयीचा ठरणार असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.

लवकरच पालिकेचे उपयोजन

संकेतस्थळात फेरबदल केल्यानंतर पालिका आता स्वत:चे अप्लिकेशनसुद्धा निर्माण करत आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे पालिकेने सांगितले. या अप्लिकेशनमुळे नागरिकांना पालिकेच्या सर्व योजना, सुविधा, माहिती अधिकार, सूचना आणि  तक्रारी करता येणार आहेत. त्याचबरोबर महापालिका अधिकारी कर्मचारी यांची माहिती तसेच शहरातील इतर सुविधा पर्यटनस्थळे, निवडणुका, ई निविदा तसेच कर भरणा करता येणार आहे. लवकरच ही उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) गूगल प्ल्येमध्ये उपलब्ध होणार आहे.