विरार : तौक्ते वादळाच्या पहिल्या दणक्यातच वसई विरार मधील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. करोना काळात पालिकेने मागच्या वर्षी रस्ते दुरुस्तीच्या कामात दिरंगाई केल्याने रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. पण यावर्षी पालिकेने यावरून धडा घेत. पावसाळ्याआधी रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती दिली आहे. वसईतील रस्ते पावसाळ्यात खड्डेमय होणार नाहीत असे पालिकेने सांगितले आहे.
मागील वर्षी पासून करोना महामारीने शहराला विळखा घातला आहे. त्यात प्रशासनाचे सर्वच विभाग व्यस्थ असल्याने शहरातील अनेक विकासकामे रखडली होती. शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. यामुळे टाळेबंदी जरी असली नागरिकांना याचा मोठा त्रास सहज करावा लागत होता. नुकत्याच आलेल्या तौक्ते वादळामुले सततच्या तीन दिवसाच्या पावसामुळे शहरातील रस्ते अधिकच खराब झाले होते. पावसाच्या माऱ्याने पावसाळ्यात रस्त्यांची अधिक दणनीय अवस्था होऊ नये म्हणून पालिकेने पावसाळ्या अगोदरच यावर्षी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शहरातील विविध रस्त्यावर दुरुस्तीची कामे सुरु आहेत. यात खड्डे बुजविणे, रस्त्यांचे डांबरीकरण करणे, पेव्हर लावणे, तसेच सिमेंट कोन्क्रीटीकरण करणे कामे सुरु आहेत. त्याच बरोबर रस्त्यालगत असलेल्या गटारांच्या दुरुस्तीची सुद्धा कामे सुरु आहेत. पालिका बांधकाम विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार पालिकेने या वर्षी रस्ते बांधणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी २० कोटी रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
पालिकेने मागील वर्षी झालेली दिरंगाई पाहता यावर्षी पावसाळ्याच्या महिनाभार आधीपासून शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. सध्या ७० टक्कय़ाहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. पावसाळ्या अगोदर सर्व कामे मार्गी लागतील.
राजेंद्र लाड, मुख्य अभियंता, बांधकाम विभाग