वसई: नालासोपारा शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या जिन्यावरील संरक्षक कठडा तुटला आहे. या पुलावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नालासोपारा शहरात पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे ( एमएसआरडीसी) २००१ मध्ये हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून नागरिकांना ये-जा करण्यासाठी मार्गिका आहे. त्यावर जाण्यासाठी जिना बनवला आहे. रेल्वे फाटक बंद असल्याने नागरिकांना या जिन्यावरून पलीकडे जावे लागत आहे. मात्र या जिन्यावरील संरक्षक कठडा मागील अनेक दिवसांपासून तुटलेला आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडते. संरक्षक कठडे नसल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या समस्येकडे महापालिका किंवा अन्य कोणीही लक्ष देत नाही , असे योगिता पवार यांनी सांगितले. याबाबत पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित संरक्षक कठडा दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. पूल जरी महापालिकेच्या ताब्यात नसला तरी त्याची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम महापालिका करत असते असेही त्यांनी सांगितले. तर पालिकेचे उपअभियंता आर के पाटील यांनी संरक्षक कठडा लवकरच पूर्ववत केला जाईल, अशी माहिती  दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Staircase takidanalasopara flyover dangerous protective wall broken chances accident amy
Show comments