भाईंदर : पहिल्या पावसाच्या हजेरीनंतर मीरा-भाईंदर शहरातील पथदिवे बंद होत असल्यामुळे अनेक परिसरांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पावसाळी वातावरणात विजेची दुरुस्त करण्याकरिता प्रशासनाला मोठी कसरत करावी लगत आहे.
यंदा जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने मोठय़ा प्रमाणात जोर धरला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचत असून विविध समस्या निर्माण होत
आहेत. यात पथदिवे बंद पडत असल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे रहदारीच्या मार्गावर देखील अंधाराचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रवाशांना रस्त्यावरील नाले, दगड व खड्डे दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत.
मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीकरिता कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र तरी देखील पथदिव्यात सातत्याने बिघाड होत असल्याचे दिसून येते. त्यात पावसाची हजेरी लागताच काशिमीरा, इंद्र लोक व काशीनगर इत्यादी परिसरात अंधार होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. शहरातील सर्व पथदिव्यांची पाहणी करण्यात येत असून बिघाड झालेले पथदिवे दुरुस्त करण्यात येत आहेत.
सतीश तांडेल, कनिष्ठ अभियंता (विद्युत विभाग )