अंधारामुळे प्रवासात अडथळे, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियमांना तिलांजली

भाईंदर : भाईंदर पश्चिम परिसरातील उत्तन मार्गावर असलेले पथदिवे गेल्या काही दिवसापासून बंद अवस्थेत असल्यामुळे सर्वत्र अंधार असते. त्यामुळे या मार्गावरून पायी प्रवास करणे देखील कठीण झाले असून कोणत्याही क्षणी अपघाताचा धोका वाढला आहे.

भाईंदर पश्चिम परिसरापासून साधारण सात किलोमीटर लांब उत्तन हा समुद्रकिनाऱ्यालगतचा परिसर आहे. या परिसरात अनेक नागरिक सतत भाईंदरच्या दिशेने प्रवास करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील मुर्धा गावाजवळ अधिकांश पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघातात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बस वाहनांनादेखील प्रवास करण्यास अळथळे निर्माण होत आहेत.

उत्तन भागात समुद्रकिनारा असल्यामुळे अनेक प्रेमी युगुल आणि युवक या भागात फेरी मारत असतात. परंतु या मार्गावर अंधार असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेत चुकीचे व लज्जास्पद वर्तन करताना दिसून येतात. त्यामुळे लवकरच या मार्गवरील पथदिवे प्रकाशमान करण्याची मागणी माजी नगरसेवक रोहित सुवर्ण यांनी प्रशासनाकडे केली आहे.

मीरा भाईंदर शहरात पदपथावरील दिवे व इतर कामांमुळे प्रशासनाला मोठय़ा प्रमाणात वीजदेयक भरावे लागते. यात कमतरता आणण्याकरिता सर्वत्र एलईडी दिवे लावण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत देयकावरील खर्चाकरिता ४४ कोटी खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र अद्यापही बंद पडलेल्या पथदिव्याऐवजी जुनेच दिवे लावण्यात येत असल्यामुळे प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत  असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण परमार यांनी केले.

या मार्गावरील पथदिवे सुरू आहेत. मात्र जे पथदिवे बंद आहेत. त्यांना दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग