भाईंदर:- मिरा-भाईंदर शहरातील उत्तन येथील परिवहन कार्यालयाला स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन घोडबंदर येथे कायम स्वरूपी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  बुधवारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे उपप्रादेशिक कार्यालय तयार झाल्याने मिरा भाईंदरच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तन येथील प्रस्तावित कार्यालयाच्या जागेला विरोध झाल्याने घोडबंदर येथील जागेत कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

मिरा-भाईंदरमधील वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. मिऱा भाईंदरच्या नागरिकांना ठाण्याला प्रादेशिक परिवहन कार्यालय होते. नागरिकांच्या सोयीसाठी आठवड्यातील दोन दिवस मिरा रोडच्या हटकेश येथे आरटीओचे एक उपकार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र वाहनांची नोंदणी, तसेच व्यावसायिक वाहनांसाठी अजूनही ठाण्यालाच जावे होते. यात वाहन चालकांचा वेळ, पैसा व इंधन वाया जात होता. दरम्यान परिवहन मंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदरसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. राज्यातले हे ५८ वे प्रादेशिक परिवहन कार्यालय होते. यासाठी उत्तन येथे हे कार्यालय तयार केले जाणार होते.

महसूल विभागाकडून परिवहन विभागाला ९ हजार ७०० चौरस मीटर इतकी जागा मंजूर करण्यात आली आहे. या कार्यालयाची उभारणी शासनाच्या एमएमआरडीएमार्फत केली जाणार असली तरी ही प्रक्रिया स्थानिक महापालिका प्रशासनाला पूर्ण करून द्यावी लागणार आहे.मात्र या जागेवर बऱ्याच वर्षांपासून स्थानिक नागरिक राहत असल्याने त्यांनी जागा देण्यास विरोध दर्शवला आहे. यासाठी १२८ घरे बाधित होणार असल्याने स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे स्वतंत्र कार्यालय मंजूर होऊनही त्याचे कार्यालय सुरू झाले नव्हते. 

ही अडचण लक्षात घेऊन घोडबंदर येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कार्यालयालाच कायम स्वरूपी कार्यालयाचे रूप देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता घोडबंदर येथे पालिकेच्या जागेवर शहराचे स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. बुधवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ झाला. यावेळी महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, प्रादेशिक परिवहन अधिकारी शुभांगीनी पाटील तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नव्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या परवान्यांसह इतर महत्त्वाच्या सेवाही देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ठाण्याला जाण्याचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. एप्रिल २०२५ पासून हे कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. “मी परिवहन मंत्री झाल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये हे कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आता हे प्रत्यक्षात उतरले आहे. नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.