वसई: अर्नाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रतीकांत भद्रेशेट्टे (३५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक रतीकांत भद्रेशेट्टे (३५) विरार पश्चिमेच्या बोलींज येथील साई ब्रह्मा इमारतीत राहत होते. ते अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी दुपारी त्यांची पत्नी बाहेर गेली असताना त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी विरारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे. ते मुळचे लातूर जिल्ह्यातील होते.
हेही वाचा : मिरा रोड येथे पिसाळलेल्या श्वानाचा लहान मुलावर जीवघेणा हल्ला
काही महिन्यांपूर्वी त्यांचा भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे ते मानसिक तणावत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र त्यांनी नक्की आत्महत्या का केली? त्याचे कारण अद्याप समजले नाही. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे