पालिकेच्या रुग्णालयांतील सर्वसामान्य रुग्णांना दिलासा नाहीच

विरार : वसई-विरार  पालिकेच्या दोन रुग्णालयांत आणि तीन माता बाल संगोपन केंद्रांत मागील पाच वर्षांत केवळ १९ हजार ८८ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यात १६ हजार ७५० या प्रसूती असून केवळ ३४४ अस्थिव्याधी शस्त्रक्रिया आणि सामान्य शस्त्रक्रिया एक हजार ९९४ झाल्या आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेने सदरचे पाच वर्षांतील आकडे खूपच कमी आहेत.  अजूनही मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी वसईकरांना मुंबई वा आसपासच्या उपनगरांवर अवलंबून राहवे लागत आहे.

 वैद्यकीय विभागात टाकलेल्या माहिती अधिकारात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार वसई विरार महानगरपालिका रुग्णालयांत झालेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची माहिती माहिती अधिकारात मागविण्यात आली होती. त्यानुसार सन २०१६ ते डिसेंबर २०२१ पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पालिकेच्या सर डीएम पेटिट रुग्णालयात १ हजार २४२ सामान्य शस्त्रक्रिया तर ३ हजार ५७४ स्त्रीरोगाच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. विजयनगर तुिळज येथील रुग्णालयात पाच वर्षांत ७५२ सामान्य शस्त्रक्रिया, ३४४ अस्थिरोग, ६ हजार ११७ स्त्रीरोगातील आणि प्रसूती केल्या आहेत. तर माता संगोपन केंद्र, सातावली येथे ३ हजार १९१ प्रसूती केल्या आहेत. सर्वोदय माता बाल संगोपन केंद्र येथे ३७० प्रसूती तर गर्भाशय स्वच्छ करण्याच्या १२१ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. माता बाल संगोपन केंद्र जुचंद्र येथील रुग्णालयात ४२२ प्रसूती शस्त्रक्रिया आणि २५५ नसबंदी, गर्भाशयाची पिशवी साफ करणे, गर्भपात शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

वरील आकडेवारीवरून पालिकेने केवळ प्रसूतीवर भर दिला आहे. तर इतर शस्त्रक्रिया मात्र नाममात्र झाल्या आहेत. यामुळे नागरिकांना आजही मोठय़ा शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई अथवा इतर उपनगरांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातही पालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टरांचा मोठा अभाव आहे. त्यातही पालिकेने आजतागायत स्वत:च्या सेवा वाढविल्या नाहीत. त्यात महात्मा फुले आरोग्य योजना सुरू केल्या नाहीत. जर योजना सुरू केल्या तर पालिकेला उत्पन्नवाढ होऊन रुग्णांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करता येतील, अशी माहिती रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी दिली आहे.