वसई : वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पुढील दिड महिन्यांपर्यत चालणार आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीतून आणली जाणार आहे. भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पूलावरून ही मेट्रो आणण्याच्या कामाला एमएमआरडीएने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर कामाला वेग आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई, विरारची एकूण लोकसंख्या आणि मीरा-भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्षात घेऊन हा मेट्रो मार्ग हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार वसई विरारसाठी मेट्रोमार्ग १३ ची घोषणा करण्यात आली आहे. भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पूलावरून मेट्रो आणण्याचे ठरविण्यात आले. खाडीवरून रस्तापूल आणि मेट्रो अशी ही रचना असणार आहे. भाईंदर नायगांव मेट्रोसहित खाडीपूल करण्याबाबतची संरचनात्मक आराखडा तयार चे काम प्रगतिपथावर आहे. भाईंदर वसई पूलाचा आराखडा व संरचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल डिझाईन) प्राधिकरणाच्या दळणवळण विभागाकडे अग्रेसित करण्यात आलेला आहे.

सर्वेक्षणाचे काम सुरू

मेट्रो आणि खाडीपूल एकाच मार्गिकवरून असले तरी त्यांचे काम एमएमआरडीएच्या दोन स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. सध्या मेट्रो मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. मेट्रो मार्ग खाडीतून जाणार असल्याने अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा लागणार आहे. भौगोलिक रचना, हवामान याचा देखील अभ्यास करण्यात येत आहे. सर्वेक्षणाचे काम येत्या दिड महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती एमएमआऱडीएचे अभियंता बनसोडे यांनी दिली. या प्रकल्पासाठी यापूर्वीच दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनची सल्लागार (डीएमआरसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर या शहरात सध्या मेट्रो मार्गाचे स्थापत्य काम चालू असून त्याच मार्गाला हा वसई-विरार मेट्रो मार्ग जोडला जाणार आहे. आता भाईंदर खाडीत प्रस्तावित पूल आणि मेट्रो एकाच ठिकाणाहून जाणार आहे. यामुळे खर्चात देखील बचत होणार आहे.

अशी असेल वसई मेट्रो

मीरा रोड ते विरार हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग असून, त्यात २० स्थानकांचा समावेश आहे. मीरा-भाईंदर ते वसई-विरार हा मेट्रो मार्ग जोडला जाणार आहे.

खाडी पूल कधी बनणार?

वसईकरांसाठी सर्वाधिक महत्वाचा असलेला भाईंदर खाडीवरील पूल अद्यापही परवानग्यांच्या कचाट्यात अडकला आहे. एमएमआरडीएने आपल्या विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत वसई (प) आणि भाईंदर (प) यांना जोडणाऱ्या खाडी पुलाच्या बांधकामाचे काम हाती घेतले आहे. पंरतु यासाठी मिठागरे विभाग,महाराष्ट्र सागरी किनारा नियंत्रण प्राधिकरण , राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरण, महाराष्ट्र सागरी मंडळ, भारतीय अंतर्देशिय जलमार्ग प्राधिकरण, वन विभाग परवानग्या आवश्यक आहेत. या कामासाठी मिठागर विभाग, वन विभागाकडून परवानग्या आवश्यक आहेत, त्या अजुन एमएमआरडीएला मिळालेल्या नाहीत, त्यामुळे पूलाच्या काम रखडले आहे. खाडी पुलाच्या परवागन्या मिळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी दिली.