वसई- मागील वर्षी सुर्या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू असताना वर्सोवा खाडीजवळ भूस्खलन होऊन ढिगार्यात गाडला गेलेला पोकलेन चालक राकेश यादव याचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी पिठाच्या गोळ्याचा प्रतिकात्मक मृतदेह बनवून त्याचे अंत्यसंस्कार केले. अद्याप राकेशला मृत घोषीत न केल्याने कुटुंबियांना मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळालेले नाही.
२९ मे रोजी वर्सोवा खाडी पुलाजवळ एल अँड टी कंपनी यांच्या मार्फत सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू असताना भूस्खलन राकेश यादव (३५) ढिगार्याखाली अडकून पडला होता. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकच्या मदतीने काही महिने शोध सुरू होता. मात्र तरी देखील त्याचा मृतदेह आढळला नव्हता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली होती तसेच बेपत्ता राकेश यादव याच्या कुटुंबियांना ५० लाखांची आर्थिक मदतही दिली होती. काही महिन्यांनी बचाव कार्य थांबविण्यात आले. तरी कागदोपत्री राकेश यादव हा ‘बेपत्ता’ आहे. बेपत्ता राकेश यादव याचे कुटुंबिय पालघर जिल्ह्यात राहतात. राकेश यादवा याच्या कुटुंबात आई वडिल, पत्नी आणि दोन मुले आहेत. राकेशचा काहीच थांगपत्ता न लागल्याने त्याचे कुटुंबिय हवालदील झाले आहेत. त्यामुळे कुटुंबियांनी नुकताच राकेशच्या प्रतिकात्मक मृतदेहाचा अंत्यसंस्कार केले. यासाठी गव्हाच्या पीठाची राकेशच्या उंचीएवढी प्रतिकृती तयार करण्यात आली. त्याला मृतदेहाप्रमाणे पांढर्या कपड्याने गुंडाळण्यात आले आणि त्यावर राकेशचे छायाचित्र लावण्यात आले आणि प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू धर्मात अंत्यविधी शास्त्रोक्त पध्दतीने केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असे त्याचे वडील भालचंद्र यादव यांनी सांगितले.
मृत्यू प्रमाणपत्राची प्रतीक्षा
राकेश यादव याला अद्याप मृत घोषीत करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्र (डेथ सर्टीफिकेट) मिळालेले नाही. आम्ही शासकीय यंत्रणेकडे चकरा मारून थकलो. जिल्हाधिकार्यांनी देखील काहीच माहिती दिली नाही. मुलाने काही पैसे भारतीय विमा कंपनीत गुंतवले आहेत. मृत्यू प्रमाणपत्राशिवाय आम्हाला त्याचे पैसे मिळत नाही अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. माझ्या मुलाला मयत घोषीत करून प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी वडिलांनी केली आहे. ही दुर्मिळात दुर्मीळ घटना असल्याने राकेश यादव याला मयत घोषीत करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्यचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले.
काय आहे प्रकरण?
एमएमआरडीएतर्फे सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. वसई खाडी ओलांडण्यासाठी टनल बोरिंग मशीन च्या साहाय्याने भूयारीकरणाचे काम प्रस्तावित आहे. वर्सोवा खाडी जवळील ससूनवघर गावात प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू होेते.या कामासाठी टनल बोरिंग मशीन जमिनीच्या भूभागात सुमारे ३२ मीटर खोलीवर पोहचवण्यासाठी लॉन्चिंग शाफ्टचे खोदकाम सुरू होते..२९ मे रोजी रात्री जमिनीचा भाग खचूर पोकलेनसह चालक राकेश यादव ही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. सागरी तटरक्षक दल (कोस्टगार्ड) राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण पथक (एसडीआरएफच्या) मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्यात आले होते. या घटनेची चौकशी करण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ञांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.