लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : मिरा भाईंदर मधील नाल्यातील गाळ स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने उभयचर पद्धतीचे चालणारे आधुनिक ड्रेन मास्टर वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येणाऱ्या अडीच कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देऊन ठराव मंजूर करण्यात आला आहे. नालेसफाई करताना ज्या ठिकाणी पोकलेन यंत्र किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेने ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर करण्यात येतो.
मिरा-भाईंदर शहरात लहान मोठे असे एकूण १५५ नाले आहेत. या नाल्यात साठलेला गाळ व कचऱ्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची निर्माण होत असते. परिणामी शहरातील सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होत असते. मागील वर्षी देखील शहरातील अनेक भागात पाणी साचून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. काही ठिकाणी घरात पाणी शिरून मालमत्तांचेही नुकसान झाले होते.
दरवर्षी महापालिका पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई करून घेते. यंदा सहा कोटी रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. हे काम कंत्राटदाराची मदतीने केले जाते.मात्र मागील दोन वर्षांपासून नालेसफाईवरील होणारा हा खर्च कमी करण्याच्या दुष्टीने प्रशानाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात शहरातील लहान नाल्यांची स्वच्छता दर पंधरा दिवसांनी केली जात आहे.तर मोठ्या नाल्या मधील गाळ काढण्यासाठी ‘ ड्रेन मास्टर आंफि्बियन’ ( जमीनवर व पाण्यात वावरणारे उभयचर वाहन) खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ड्रेन मास्टर यंत्राचा फायदा
नालेसफाई करताना ज्या ठिकाणी पोकलेन यंत्र किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेने ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर केला होता. हे यंत्र पाण्यावर तरंगून तसेच जमिनीवरून किंवा ड्राय नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम करते. यामुळे नालेसफाई परिणामकारक होेते. मे. क्लीनटेक इन्फ्रा लिमिटेड या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले असून २ कोटी ५० लाख ७०० हजार इतकी यंत्राची किंमत आहे.
तसेच या यंत्रामध्ये गाळ शोषून काढण्याची क्षमता अधिक असल्याने प्लास्टिक व इतर पाणी अडकवणारे साहित्य खेचून बाहेर काढणे सहज होत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पुढील दोन वर्ष वाहनाच्या देखभाल -दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे.हा खर्च शासन निधीतुन उचलण्यात येणार असून यातील दोन कोटी रुपये महापालिकेला वर्ग झाले आहेत. या वाहनांमुळे शहरातील नाले कोणत्याही क्षणी साफ करणे शक्य होणार असून यापूर्वी होणाऱ्या आर्थिक खर्चात देखील बचत होणार असल्याची माहिती मिरा भाईंदर महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे.