वसई: मालदीव देशात शेफ म्हणून नोकरीसाठी गेलेल्या तरुणाला मजूर बनवून डांबून ठेवण्यात आले होते. मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा कक्षाने याप्रकरणी भारतीय दुतावासाच्या माध्यमातून या तरुणाची सुखरूप सुटका केली. तब्बल ८ महिने या तरुणाचे कुटुंबीय त्याच्या सुटकेसाठी भारत सरकारचे उंबरठे झिजवत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मन पारेख (२४) हा तरुण भाईंदर येथे राहत असून तो व्यवसायाने शेफ आहे. परदेशात जाऊन चांगल्या पगाराची नोकरी करावी हे त्याचे स्वप्न होते. एका एजंटच्या माध्यमातून तो डिसेंबर २०२३ मध्ये मालदीव देशातील राहा रिसॉर्टमध्ये कामासाठी गेला होता. मनला चांगला पगार, सोयीसुविधा आदींचे आमीष दाखविण्यात आले होते. पंरतु तेथे प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. त्याला तेथे मजूर म्हणून राबविण्यात आले होते. बांधकाम, रस्ते, साफसफाई आदी कामे त्याच्याकडून करवून घेतली जात होती. दिवसातून त्याच्याकडून १८ ते २० तास काम करवून घेतले जात होते. काम न केल्यास त्याला धमकाविण्यात येत होते. त्याला पगारही देण्यात येत नव्हता. राहा रिसॉर्टचा मालक तेथील आमदार होता. सतत होत असलेली उपासमार, प्रचंड काम यामुळे तो आजारी पडत होता. त्याने हा प्रकार आपल्या आईला सांगितला होता.

हेही वाचा – “काल भिजलेल्या कोंबडीप्रमाणे, आज कंठ फुटला” विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल

मन हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईने मुलाच्या सुटकेसाठी मागील ६ महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्याची आई गायत्री पारेख भारतीय दुतावास, पंतप्रधान कार्यालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करून मुलाच्या सुटकेच्या याचना करत होत्या. परंतु त्यांना यश आले नाही. अखेर त्या १५ नोव्हेंबर रोजी भाईंदर येथील भरोसा कक्षात पोहोचल्या. कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी याप्रकरणाची दखल घेत तात्काळ कारवाई सुरू केली. त्यांनी भारतीय दुतावासाच्या माध्यमातून राहा रिसॉर्टच्या मालकाशी संपर्क केला. मन पारेख याला बेकायदेशीर डांबून ठेवून त्याच्याकडून मजुरी करून घेतली जात आहे. त्याची तात्काळ सुटका न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव टाकण्यात शिंदे यांना यश आले. अखेर मनची सुटका करण्यात आली. तो नुकताच भारतात सुखरूप परतला आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शानाखील सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे, भारती देशमुख, आफरिन जुन्नेदी, पुजा हांडे, अक्षय हासे, विजय घाडगे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा – “नोटा वाटप आरोपाचा भाजपला फायदा होईल”, उमेदवार राजन नाईक यांचा दावा

…सारं काही संपलं होतं – मन पारेख

या रिसॉर्टमध्ये माझी फसवणूक झाली आणि परतीचा मार्ग बंद झाला होता. दिवसाला १८ ते २० तास मजुरीचे काम, उपासमार यामुळे मी प्रचंड निराश झालो होतो, असं मन याने सांगितले. मात्र भरोसा सेलच्या तेजश्री शिंदे आणि अन्य अधिकार्‍यांनी या नरकातून माझी सुटका केल्याबद्दल त्याने आभार व्यक्त केले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taken as a chef and made a labourer the youth was released from maldives by bharosa cell ssb