वसई : वाहनाला धडक दिल्याने झालेल्या वादातून वाहनातील चौघांनी टॅंकरचालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू झाला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर फरार झालेल्या चौघांना नायगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
रामकिशोर पुशवाह (४०) हा खासगी कंपनीत चालकाचे काम करतो.. रविवारी तो कंपनीचा टॅंकर घेऊन मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गुजराथच्या दिशेन जात होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा टॅंकर मालजीपाडा येथून जात असताना एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत वाहनाचे नुकसान झाले होते. वाहनातील चौघांनी रामकिशोर यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र रविवार असल्याने कंपनी बंद आहे. सोमवारी कंपनीत बोलून भरपाई दिली जाईल असे रामकिशोर यांने सांगितले. मात्र त्यावर वाहनातील चौघांचे समाधान झाले नाही. त्या चौघांनी रामकिशोर याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर चौघेही आरोपी फरार झाले.
हेही वाचा… वसई : ८० कोटींच्या कंत्राटाचे आमिष, व्यापार्याची दीड कोटींची फसवणूक
या प्रकऱणी नायगाव पोलिसांनी चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा कलम ३०४, ४२७,३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शीच्या आधारे पोलिसांनी वाहनाचा क्रमांक मिळवला आणि सोमवारी चौघांना अटक केली. अटक केलेले आरोपी नालासोपारा येथे राहणारे आहेत. आम्ही आरोपींना अटक केली आहे. वाहनाला दिलेल्या धडकेतून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले.