प्रभाग अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

भाईंदर : भूतकाळात तसेच वर्तमानकाळात सातत्याने अनधिकृत बांधकाम करत असलेल्या व्यावसायिकांची यादी तयार करून त्याविरोधात एमआरटीपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांवर आळा बसणार आहे.

मीरा भाईंदर शहर हे मुंबईलगत असल्यामुळे या शहराचा विकास अत्यंत झपाटय़ाने होत आहे. येथील पालिका प्रशासनाकडून विविध स्वरूपांच्या उपाययोजना आखण्यात येत असून नागरिकांच्या सुखसुविधेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील जमिनीच्या आणि इमारतीमधील खोल्यांच्या किमतीत झपाटय़ाने वाढ होऊन ती महागली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध असलेल्या शासकीय तसेच वन विभागातील  जागेत खोटय़ा पद्धतीने अनधिकृत बांधकाम करून त्या सामान्य नागरिकांना विकणाऱ्या विकासकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून अशा व्यावसायिकांवर आळा आणण्याकरिता प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.

याकरिता पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्याला ही जबाबदारी सोपवली आहे. तसेच पालिकेचे एक स्वतंत्र अतिक्रमण विभागदेखील तयार केले असून त्यानुसार वेळोवेळी शहरातील अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येते. याकरिता पालिकेला मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ आणि आर्थिक खर्च करावा लागतो. मात्र तरीदेखील अनेक भूमाफिया, हॉटेल व्यावसायिक आणि औद्योगिक वसाहतीमधील व्यावसायिक प्रशासनाच्या नियमांचे सातत्याने उलंघन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

मीरा भाईंदर शहरात सातत्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांचा अहवाल तयार करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या अहवालाची अतिक्रमण विभागाद्वारे पडताळणी करण्यात आल्यानंतर अशा व्यावसायिकांविरोधात त्या त्या प्रभागातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली आहे. तर तीनपेक्षा अधिक बांधकाम केलेल्या व्यावसायिकांवर प्रामुख्याने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानुसार मिळाली आहे.