वसई : विरार पूर्वेच्या मांडवी येथील आठवडे बाजारात विक्रेत्यांकडून बाजार कर वसुलीत निर्धारित रकमेपेक्षा अधिकचे पैसे घेतले जात आहेत. यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांची आर्थिक लूट होत आहे.
विरार पूर्वेला मांडवी येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात ग्रामीण भागातील स्थानिक महिला, शेतकरी आपला शेतमाल आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू विक्रीसाठी घेऊन येतात. इतरही विक्रेते बाजारात खरेदी-विक्रीसाठी येतात. याच देवाण-घेवाणीतून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या बाजारात कर वसूल करण्यासाठी पालिकेने ठेका दिला आहे. परंतु कर वसूल करताना निर्धारित रकमेपेक्षा अधिकचा कर वसूल केला जात आहे. करासाठी ३० रुपयांची पावती देऊन जवळपास १५०, २०० रुपयांच्या बाजारकरांची वसुली होते आहे. पालिकेचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदार अरेरावी करून विक्रेत्यांकडून करापोटी ही जास्तीची रक्कम वसूल करत आहे. एकाच विक्रेत्याला तीन ते चार पावत्या देऊन त्याच्याकडून कर वसुली केली जात आहे. काही जणांकडून तर विनापावतीच करवसुली होते. मांडवी परिसर हा प्रभाग ‘एफ’मध्ये येत असतानाही ‘सी’ प्रभागाच्या पावत्या विक्रेत्यांना दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
बाजार करापेक्षा अधिकचे पैसे वसूल केले जात असल्याने, विक्रेते नाराज आहेत. दिवसभर बसून जेवढा धंदा होत नाही, तेवढेच पैसे जर कर स्वरूपात द्यायचे झाले तर उदरनिर्वाह कसा करणार आणि मग बाजारात येण्याचे प्रयोजनच काय उरेल, असा सवाल विक्रेते करतात. पालिकेने याकडे लक्ष देऊन अतिरिक्त करवसुली करणाऱ्या ठेकेदार यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांवर बाजार कराचा भार
वसई विविध ठिकाणच्या ग्रामीण भागातून शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. अवकाळी पाऊस आणि अनेक अडचणींचे अडथळे पार करून शेतकरी कांदा आणि इतर माल बाजारात आणतात. त्यावरही पालिकेकडून जादा रक्कम कराच्या नावाखाली वसूल होते. ठेकेदार कांदा व इतर मालधारकांकडून बाजार करापेक्षा पाच पटीने जास्त म्हणजेच २०० रुपये कर घेतात. आधीच कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच ठेकेदाराला नफा मिळण्यासाठी ही अवाचे सव्वा वसुली केली जात असल्याने सगळा भार शेवटी शेतकऱ्यावर येतो आहे.
मांडवी बाजारात करवसुलीचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला गेला आहे त्याची सविस्तर माहिती घेतली जाईल. चुकीच्या पद्धतीने बाजार कर वसूल केला जात असेल तर त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. – रुपाली संखे, सहायक आयुक्त प्रभाग समिती ‘एफ’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा