लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : वसईच्या वासळई येथील तलाठी विलास करे याने कार्यालयात कामासाठी आलेल्या महिलेच्या केलेल्या विनयभंगाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पोलिसांची संशयास्पद भूमिका आणि आरोपी तलाठ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी बुधवार १२ जून रोजी वसईच्या तलसिलदार कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देखील याप्रकरणी तलाठ्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

मागील आठवड्यात सातबार्‍याचा फेरफार करण्याच्या कामासाठी एक महिला वासळई येथील तलाठी कार्यालयात गेली होती. त्यावेळी तलाठी विलास करे याने या महिलेशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला होता. सकाळी तलाठी कार्यालयात हा प्रकार घडला होता. पीडित महिला शिक्षिका असून या प्रकरणी तिने वसई पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तलाठ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र लगेच जामिन मंजूर करण्यात आला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले. विविध संघटना आणि पक्षांनी पोलिसांच्या या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणा आरोपीला ‘शाही’ वागणूक देणार्‍या वसई पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. आरोपीवर कठोर कारवाई करावी, नव्याने चौकशी करावी या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना आणि पक्षातर्फे बुधवारी १२ जून रोजी सकाळी ११ वाजता वसई तहसिलदार कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.

आणखी वाचा-वसई : शाळकरी मुलीने उलटवला सायबर भामट्याचा डाव

तलाठ्याला बडतर्फ करा- आमदार हितेंद्र ठाकूर

या प्रकाराबाबत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. सभ्यता आणि संस्कृती अशी ओळख असलेल्या वसईत असा प्रकार कदापी खपवून घेतला जाणार नाही. विलास करे या तलाठ्याला विनाविलंबत सेवेतून बडतर्फ करावी अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे.

निलंबनाचा प्रस्ताव

याबाबत वसईचे तहसिलदार अविनाश कोष्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक असल्याचे सांगितले. तलाठी करे याला निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. कुणाशीही गैरवर्तन केल्याचे खपवून घेतले जाणार नाही, असे तहसिलदारांनी सांगितले.

विलाल करे याची वादग्रस्त पार्श्वभूमी

दोन वर्षापूर्वी तलाठी विसाल करे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली होती. तेव्हा तो एक वर्ष निलंबित होता. यापूर्वी देखील त्याने एका महिलेशी असभ्य वर्तन केले होते. वसई पोलीस ठाण्यात या महिलेने तलाठी विलास करे याला ‘प्रसाद’ दिला होता. मात्र गुन्हा न दाखल करता त्याला समज देऊन सोडण्यात आले होते.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher molested by talathi in vasai demand of mla hitendra thakur to dismissal talathi mrj