शाडू , लाल माती, कागदी लगद्याला पसंती; गतवर्षीपासून ग्राहकांचाही प्रतिसाद
कल्पेश भोईर
वसई: गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीमुळे होणारे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विविध ठिकाणच्या कलाकारांनी पर्यावरण पूरक मूर्त्यां तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. यात शाडू माती, लाल माती, कागदीलगदा अशा पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून या मूर्त्यां तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ (पीओपी)पासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर त्याचे लवकर विघटन होत नाही. मूर्तीला देण्यात येत असलेल्या रासायनिक रंगामुळे विसर्जनानंतर पाणी प्रदूषित होत असते. यामुळे पाण्यातील जैविक घटकांना याचा धोका निर्माण होत असतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्त्यांना नागरिकांची मागणी वाढू लागली आहे. कलाकारांनीही आता पर्यावरणपूरक गणेश मूर्त्यां साकारण्यास सुरुवात केली आहे. अनेक कलाकारांनी शाडू माती, कागदाचा लगदा, लाल माती, सुतळ, काथा, गेरू यांचा वापर करून मूर्त्यां तयार करू लागले आहेत.
नायगाव पूर्व चंद्रपाडा येथील दिनेश पाटील या कलाकारानेही यावर्षी शाडू माती व कागदाचा लगदा याचा वापर करून मूर्त्यां तयार केल्या आहेत. मागील वर्षी केवळ ३० ते ३५ मूर्त्यां तयार केल्या होत्या. नागरिकांची मागणी पाहता यावर्षी जवळपास ५० ते ५५ मूर्त्यां तयार करण्यात आल्या असल्याची माहिती त्रिमूर्ती आर्टस्चे दिनेश पाटील यांनी सांगितले आहे. तसेच भाईंदर पश्चिम राईगाव येथील कलाकार हेमेंद्र भोईर यांनी देखील सुबक अशा पर्यावरणपूरक लाल मातीपासून गणेश मूर्त्यां तयार केल्या आहेत. १२ ते १८ इंचापर्यंतच्या या मूर्त्यां असून गेरू व नैसर्गिक रंगाच्या साहाय्याने या रंगविल्या आहेत. विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती लगेच पाण्यात विरघळून जाईल. घरच्या घरी या मूर्त्यांचे विसर्जन करता येऊ शकते. त्या मातीचा पुनर्वापर करता येऊ शकतो. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आमचा हातभार लागावा यासाठी ग्राहकांना मूर्ती, त्यासोबत कुंडी व एक झाडही दिले जाणार आहे. जेणेकरून विसर्जन झाल्यानंतर ती माती कुंडीत टाकून त्यात ते झाड लावता येईल असे देवयानी कलाकेंद्राचे हेमेंद्र भोईर यांनी सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवाही उपलब्ध
‘इको मोरया’ या संकल्पनेतून या गणेशमूर्ती अधिक सुरक्षितपणे परदेशस्थ भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेची व्यवस्था केली गेली आहे. अतिशय सुरक्षित वेष्टणांच्या कोंदणात मूर्ती ठेवून, ती कुरीअरद्वारे घरपोच पाठवली जाते. आतील वेष्टनांचे थर आणि मजबूत बॉक्स, यांच्या सहाय्याने मूर्तीचा प्रवास सुखरूप आणि सुरक्षित होईल, याची काळजी घेतली जाते. परदेशातील असंख्य गणेशभक्तांसाठी हा इको मोरया पोहचविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
‘इको मोरया’ मूर्त्यां मजबूतही
मयूर सामंत व त्यांचे सहकारी यांनीही ‘इको मोरया’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. छपाई उद्योगातील टाकाऊ कागदाचा पुनर्वापर व गोंद यांचा वापर करून सुंदर रंगीत गणेश मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. या मूर्त्यां पीओपी किंवा मातीच्या गणपतीच्या तुलनेत मजबूत असूनही वजनाला हलक्या असल्याने वाहतूक करणे सहजसुलभ आहे. यावर्षी जवळपास ४० कलाकारांनी मिळून २ हजारांहून अधिक मूर्त्यां तयार केल्या असून त्याची विरार, बोरिवली, अंधेरी, डोंबिवली यांसह इतर ठिकाणच्या भागात विक्री केंद्रात त्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत तर ऑनलाईनसुद्धा या मूर्त्यां विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती या कलाकारांनी दिली आहे.
पर्यावरण रक्षण व्हावे या उद्देशाने मागील वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्त्यां तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षीही पूर्णत: पर्यावरणपूरक अशा लाल मातीच्या मूर्त्यां तयार केल्या आहेत. ग्राहकही हळूहळू याकडे वळत असल्याने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ही संकल्पना अधिक प्रभावी पणे रुजू लागली आहे.
– हेमेंद्र भोईर, मूर्तिकार देवयानी आर्टस्,भाईंदर- राईगाव