वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारच्या कोपर फाटा येथील उड्डाणपुलावर एकाच वेळी तीन वाहनांचा भीषण अपघात घडला आहे. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार पूर्वेच्या भागात असलेल्या कोपर फाटा उड्डाणपुलावर रविवारी दुपारी ३ च्या सुमारास एमएच ए आर ३२७३ ट्रेलर टॅंकर भरधाव वेगाने मुंबईवरून अहमदाबादच्या दिशेने जात असताना टँकरच्या पुढील कारने अचानक ब्रेक मारला.
त्यानंतर ट्रेलर चालकांने जोराचा ब्रेक मारल्याने ट्रेलर जागीच आडवा झाला. त्यामुळे मागून येणाऱ्या इनोव्हा व वॅगनार या ट्रेलरच्या मधोमध धडक बसून अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. वाहतूक व मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.