वसई- मागील ४ महिन्यांपासून मोकाट असणार्या सिरियल रेपिस्टने आणखी एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नालासोपारा येथे मंगळवारी दुपारी ७ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विकृताला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृतांची (सिरियल रेपिस्ट) दहशत पसरली होती. हे दोन विकृत वसई विरार आणि नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकरणी तुळींज पोलिसांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी या दोन्ही विकृत आरोपींना (सिरियल रेपिस्ट) पकडण्यासाठी पथके बनवून आरोपींची छायाचित्रे ठिकठिकाणी लावण्यात आली होती. तसेच त्यांची माहिती देणार्यास बक्षिस जाहीर करण्यात आले होते. या विकृतांपैकी एक विकृत विशाल कनोजिया याला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने वाराणसी येथील केंट रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसटीएफ) मदतीने ही कारवाई करण्यात आली होती. मात्र दुसरा विकृत पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
हेही वाचा – वसई : अभ्यास करत नाही म्हणून आई वडील रागावले; १० वीची मुलगी घर सोडून सत्संगला लागली
पोलीस या विकृताचा शोध घेत असतानाच या मोकाट असलेल्या विकृताने मंगळवारी दुपारी नालासोपारा येथील एका चिमुकलीला आपले शिकार बनवले. पीडित मुलगी ७ वर्षांची असून ती नालासोपारा पूर्वेला राहते. दुपारी साडेबाराच्या सुमारास एक विकृत तिच्या इमारतीजवळ आला. या पीडित मुलीला त्याने बळजबरीने पळवून इमारतीच्या गच्चीवर नेले आणि तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात या विकृताविरोधात अनैसर्गिक बलात्कार (कलम ३७७), अपहरण (कलम ३६३) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलम ४, ६ ८ आणि १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस मागावर असतानाही या विकृताने एका मुलीवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथके परिसर पिंजून काढून आरोपीचा शोध घेत आहेत. लवकरच आम्ही आरोपीला पकडू, असा विश्वास गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – विश्लेषण : मुंबई लोकलचे मोटरमन असंतुष्ट का आहेत? कोणत्या कारवाईची सतत भीती?
२०१८ मधील ‘सिरियल रेपिस्ट’च्या आठवणी ताज्या
२०१८ मध्ये नालासोपारा शहरात अशाच एका विकृताची (सिरियल रेपिस्ट) दहशत पसरली होती. रेहान कुरेशी नावाचा विकृत रस्त्यात शाळकरी मुलींना अडवून त्यांना आडमार्गाला नेऊन विनयभंग तसेच बलात्कार करत होता. नालासोपार्यातील अनेक मुलींवर त्याने अशा प्रकारे अत्याचार केले होते. मात्र फक्त ३ मुलींनी तक्रारी दिल्या होत्या. मुंबई, नवी मुंबई ठाणे, मीर रोड, भाईंदर येथील २०० हून अधिक मुलींवर त्याने अशाप्रकारे लैगिक अत्याचार केल्याची उघड झाले होते. दोन वर्षे त्याची दशहत होती. नंतर त्याला गुन्हे शाखेने अटक केली होती.