सुहास बिऱ्हाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसईची ओळख असलेला हरित पट्टा झपाटय़ाने कमी होत असून वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ‘आयआयटी मुंबई’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा अहवाल धोक्याची सूचना देणारा असल्याचे सांगून पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

‘आयआयटी’च्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने वसई -विरार शहरातील सद्य:स्थिती दर्शविणारा पर्यावरण अहवाल प्रसिद्ध केला आहे. शहरात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू झाल्यानंतर ४.८ वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) आणि १.४० विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) लागू झाले. त्यामुळे झपाटय़ाने बांधकामे होऊ लागली आहेत, असे या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.

हेही वाचा >>>वसईतील अनधिकृत इमारतींची संख्या ५५ वरून ११७ वर, आणखी ६२ इमारती आढळल्या

नैसर्गिक नाले बुजवले असून कांदळवने नष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रतील हरित पट्टा कमी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहरातील कूपनलिका आणि विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आम्ही गेल्या काही वर्षांपासून जी भीती व्यक्त करत होतो तेच आता या पर्यावरण अहवालातून उघड झाल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नालासोपार्‍यात महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, अपघाताचा रचला होता बनाव

ध्वनिप्रदूषणात वाढ..

सर्वसाधारण आवाजाचा निर्देशांक हा ० ते ५० असा असणे आवश्यक असताना वसईत तो १७० पर्यंत आहे. शहरात रोज ९७५ टन कचरा तयार होतो. पण, अवघा ५० टक्के (५००-५५० टन) कचरा उचलला जातो. त्यावरही वर्गीकरण केले जात नाही. कचरा व्यवस्थापन नसल्याने गटारे, नदी, खाडी, समुद्र, जमीन, पाणी सर्व प्रदूषित होत आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The green area of vasai is rapidly decreasing and the health of the citizens is a threat due to increasing pollution amy
Show comments