वसई: वसई विरार तसेच मिरा भाईंदर शहरात मागील ३ महिन्यात कोट्यवधी रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यावरून अमली पदार्थांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत ते दिसून येत आहेत. मात्र यापेक्षाही चिंताजनक बाब म्हणजे या अमली पदार्थांच्या व्यवहारात असलेला पोलिसांचा सहभाग. तुळींज आणि नया नगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्यांना अमली पदार्थ विक्रेत्यांकडून लाच घेताना अटक करण्यात आली. नया नगर मधील एक पोलीस तर चक्क लातूर येथील गावच्या शेतील अमली पदार्थांचा कारखाना चालवत होता. अमली पदार्थांचा वाढत असलेला विळखा आणि पोलिसांचा त्याला असलेला पाठिंबा हे अत्यंत गंभीर आहे.
वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरात असलेला अमली पदार्थांचा विळखा काही नवीन नाही. कारवाई होऊनही याचे प्रमाण कमी न होता वाढत आहे ही खरी समस्या आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारांवर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा सतत कारवाई करत असते. या कारवायांतून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची आकडेवारी पाहिले असता डोळे विस्फारतात. वसई, भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या व्यवहारावरील कारवायांत वाढ झाली आहे. वसईच्या गुन्हे शाखेने एप्रिल महिन्याच्या
सुरवातीला ११ कोटींचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले. त्यापाठोपाठ मिरा रोडच्या गुन्हे शाखेने देखील २२ कोटींची एमडी आणि कोकेन हे अमली पदार्थ जप्त केले. याशिवाय शहरात लहान मोठ्या कारवाया सुरूच आहे. जानेवारी ते मार्च या ३ महिन्यात अमली पदार्थांच्या २३३ ठिकाणी छापे टाकून कारवाया करण्यात आली. ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली. तरी देखील या कारवाया हिमनगाचे टोक असल्याचे खुद्द पोलीस अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे अमली पदार्थांचे पाळेमुळ किती खोलवर रुजली आहेत ते दिसून येत आहे.
अमली पदार्थांत पोलिसांचा वाढता सहभाग
अमली पदार्थांचे जाळे विस्तारत असताना आणखी एक चिंतेची बाब म्हणजे खुद्द पोलिसांचाच अमली पदार्थांच्या व्यवहारात असलेला वाढता सहभाग. शनिवारी मिरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर (५६) याला ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी लाच घेणे आणि त्यांच्यावर कारवाई होणे या काही नवीन घटना नाही. परंतु या पोलिसाने चक्क अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणातील अटक आरोपीकडून लाच मागितली होती. अशीच घटना मार्च महिन्यात नालासोपार्यात घडली होती. तुळींज पोलीस ठाण्यातील विठ्ठळ सगळे हा पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. शहरात अमली पदार्थांची विक्री
करण्यासाठी दरमहा ५० हजारांच्या हफ्त्याची मागणी त्याने एका अमली पदार्थ विक्रेत्याकडे केली होती. त्या अमली पदार्थ विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितले आणि सापळा लावून सगळेला अटक केली. या दोन घटना तर झाल्या अमली पदार्थांला संरक्षण देणार्या मात्र नया नगर पोलीस ठाण्याती एका पोलिसाने तर अगदी पुढचे टोक गाठले होते. प्रमोद केंंद्रे हा पोलीस कर्मचारी गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत होता. त्याने लातूर या त्याच्या गावत चक्क एमडी (मॅफेड्रॉन) हे अमली पदार्थ बनविण्याता कारखाना उभारला होता. स्वत: पोलीस आणि ग्रामीण भागातील शेत. त्यामुळे कुणालाही संशय येणार नाही अशी त्याची खात्री होती. त्यामुळे आपल्या साथीदारांच्या मदतीने तो कच्चा माल आणून या शेतात अमली पदार्थ तयार करत होता. महसूल गुप्तचर संचालनालयाला कुणकूण लागली. पथकाने त्याचा शेताता छापा टाकला असता अमली पदार्थ तयार करणारा कारखानाच आढळून आला. या कारवाईत ११.३६ किलो मेफेड्रोन,
प्रयोगशाळेतील अत्याधुनिक उपकरणे आणि साहित्य असे १७ कोटी रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले होते. अमली पदार्थाची तस्करी करणे दिवसेंदिवस सक्रीय होत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसच त्यांना सामील होऊ लागले आहे. अमली पदार्थांचा व्यवहार पोलिसांच्या सहकार्याशिवाय सुरू राहणे शक्य नाही. मध्यंतरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडवणीस यांनी घोषणा केली होती की अमली पदार्थांच्या व्यवहारात कुठल्याही प्रकारचा सहभाग आढळला तर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल. परंतु त्याचे देखील भय पोलिसांना उरलेले नाही.
नायजेरियन नागरिकांची रसद बंद करा
झटपट आणि प्रचंड पैसा मिळत असल्याने अमली पदार्थांची विक्री करणार्यांमध्ये आता नायजेरियन नागरिकांबरोबर स्थानिकांचा सहभाग वाढत आहे. हे सर्व थांबवायचे असल्यास तळापासून कारवाई करावी लागणार आहे. शहरात बेकायदेशीररित्या राहणारे बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्याबाबत सर्वच पक्ष आग्रही असतात. पण नायजेरियन नागरिकांबाबत कुणी आवाज उठवत नाही. कारण बहुतांश नायजेरिनय नागरिकांचाचा अमली पदार्थांच्या विक्रीत सहभाग आढळून येत आहे. आजवर ज्या मोठ्या कारवाया झाल्या त्यात नायजेरियन नागरिक प्रमुख आरोपी होती. कुणाकडे बनावट पारपत्र, व्हिसाची मुदत संपूनही बेकायदेशीर वास्तव्य करणारे होते. मात्र त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई होताना दिसत नाही. नालासोपारा मधील तुळींज, प्रगती नगर आणि एव्हरशाईन मधील महेश पार्क ही ठिकाणी या नायजेरियन
नागरिकांचा अड्डा बनू लागली आहेत. या नायजेरियन नागरिकांना स्थानिक नागरिकच काही पैशांच्या लालसेपोटी घरे देत असतात. हे नायजेरियन बनावट कागदपत्रांच्या आधारे ते देशात प्रवेश करून वास्तव्य करत असतात. त्यामुळे घरे भाड्याने देताना पोलिसांचा ‘ना हरकत दाखला’ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय परदेशी नागरिकांना घरे देताना ‘सी’ फॉर्म भरून पोलिसांचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो मात्र अनेक परदेशी नागरिक पोलिसांच्या अशा दाखल्याशिवाय रहात आहेत. मागील वर्षी एकट्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे नायजेरियन नागरिकांना घरे देणार्यांविरोधात २४ गुन्हे दाखल होते. परंतु आजही त्यांना घरे मिळत आहे. अगदी वाहन परवाना देखील दिला जात आहे.
अमली पदार्थांमुळे तरूणाई व्यसनाधीन बनत चालली असून त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे.
अमली पदार्थांचे घातक परिणाम दिसून येत आहे. येणार्या काळात ते अधिक उग्र रुप धारण करतील. त्यामुळे अमली पदार्थांचा राक्षसाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पोलिसांना अशा व्यवहारांना छुपा पाठिंबा असतो. कारण त्यातून आर्थिक लाभ मिळत असतो. सर्वप्रथम अशा पोलिसांना हुडूकून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.