सुहास बिर्‍हाडे

आरसा खोटं बोलत नाही. जे वास्तव आहे ते दाखवतो. वसईच्या सद्यस्थितीचे भीषण वास्तव आयआयटीच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालाने आरशाप्रमाणे स्पष्ट दाखवलं आहे. या अहवालाने वसईवरील संकटाची झलक स्पष्ट दिसू लागली आहे. शहरातील हरित पट्टा नष्ट होत असून जल, ध्वनी, वायू अशा सर्व प्रकारचे प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आल्याचे असल्याचे समोर आणलंय. पण या आरशाकडे बघून वास्तव स्विकारायला हवं, उपाययोजना करायला हवी..

महापालिकांना दरवर्षी शहरातील पर्यावरणाची सद्यस्थिती दाखवणारा अहवाल तयार कऱणे बंधनकारक असते. वसई विरार महापालिकेने पहिल्यांदाच आयआयटी मुंबईच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागला ९ लाख रुपये देऊन चालू वर्षात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या वर्षाचा अहवाल तयार करून घेतला आहे. या अहवालाने वसईचा हरित पट्टा नष्ट होत असून प्रदूषणाचा विळखा वाढत असल्याचे एका आरश्याप्रमाणे स्पष्टपणे दाखवले आहे. यामध्ये हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा या तिनही मोसमाील माती, हवेची गुणवत्ता, ध्वनी प्रदूषण प्रमाण , पाणी प्रदूषण, हवेतील प्रदूषण,  जमिनीतील आद्रता, पाण्याची धारण क्षमता, प्रदूषणाचे प्रमाण इत्यादी घटक तपासण्यात आले. शहरात वर्षाला सरासरी २ ते अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडत असतो. तरी देखील शहरात तीव्र पाणी टंचाई आहे.

शहरातील तलाव दूषीत झाली आहेत.  कारखान्याची सांडपाणी थेट खाडी आणि समुद्रात सोडण्यात येत आहे. एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू झाल्यानंतर ४.८ वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) आणि १.४० विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) लागू झाले. त्यामुळे झपाट्याने बांधकामे होऊ लागली आहेत. दुसरीकडे अनधिकृत बांधकामामुळे शहराचे नियोजन कोलमडले. औद्योगिक क्षेत्रातही झपाट्याने वाढ झाली आहे. या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापली जात आहे, असे या अहवालात (पान क्रमांक ७१) वर स्पष्टपणे म्हटले आहे. नैसर्गिक नाले बुजवली गेली असून कांदळवने नष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे महानगर पालिका क्षेत्रतील हरित पट्टा कमी होत आहे. तुंगारेश्वर अभयारण्य आणि किनारपट्टीचा भाग सोडला तर शहरात झाडांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. शहरातील पक्ष्यांची संख्या देखील कमी झाला आहे.

शहरातील बोरींग आणि विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्यातील क्षार (टिडीएस) आणि हायड्रोजनचे प्रमाण (पीएच) मात्रा वाढली आहे. टिडीएस २०० पर्यत असणे आवश्यक आहे. मात्र वसईतील पाणी क्षारयुक्त झाल्याने या टीडीएसचे प्रमाण ३५० ते ८०० पर्यंत आहे. औद्योगिक कंपन्यांचे पाणी नदी आणि नैसर्गिक नाल्याचे सोडले जात असल्याने पाणी प्रदूषीत झाले आहे. याशिवाय विविध प्रदूषित घटक मातीत मिसळल्याने शहरातील मातीचा स्तर खालावला आहे. परिणामी शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. खाड्यातून अतिउपसा होत असल्यामुळे नदी, खाड्या मृत होण्याची भीती या अहवालात नमूद करण्यात आली आहे.  शहरातील विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे होणार्‍या मृत्यूंची आकडेवारी देखील अहवाल प्रसिध्द कऱण्यात आली आहे.

सर्वसाधारण आवाजाचा निर्देशांक (एअर क्वॉलिटी इंडेक्स) हा ० ते ५० असा असणे आवश्यक असताना वसईती तो १७० पर्यंत आहे. शहरात रोज ९७५ टन कचरा तयार होतो. पण जेमतेम ५०% ( ५००-५५० टन) कचरा उचलला जातो. त्यावरही वर्गीकरण केले जात नाही. कचरा व्यवस्थपन नसल्याने गटारे, नदी, खाडी, समुद्र, जमीन, पाणी सर्व प्रदूषित होत आहे. उर्वरित कचरा शहरात इतरत्र पडलेला असतो, असे या अहवालात सांगितले आहे. वसईत लोकसंख्येचा स्फोट होणार आहे. २०१२ मध्ये १२ लाख लोकंख्या होती. २०१९ मध्ये ती २० लाख ७६ हजार झाली.मागील दहा वर्षात ७० टक्क्यांनी वसई विरार शहराची लोकसंख्या वाढली होती. २०३१ पर्यंत लोकसंख्या वाढून ३१ लाख १४ हजार तर २०४१ पर्यंत सुमारे ४० लाख होणार आहे  एमएमआरडीएने दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या विकास आराखड्यातही वसईची लोकसंख्या २०४१ पर्यंत ४५ लाख होणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे मूलभुत सोयीसुविधांसाठी वसईकरांना झगडावे लागणार आहे. राहणीमानाचा दर्जा खालावणार आहे.

हरित वसईला वाचविण्यासाठी ९० च्या दशकात चळवळ उभी राहिली होती आणि हा हरित पट्टा वाचला. पण आता या संकटकाळात  लढणार्‍या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांची पिढी आता उतारवयाकडे झुकली आहे. त्यामुळे नव्या जोमाचे कार्यकर्ते अधिक संख्येने तयार व्हायला हवेत आणि वसई वाचवायला हवी. नव्याने हरित वसई चळवळ सक्रीय करणे गरजेचे आहे. वसईतील गिरीज या निसर्गरम्य गावातील पोर्तुगिजकालीन चर्चवर एक वाक्य आहे. माणसाने सर्व जग जिंकलं पण स्वत:चा आत्मा गमावला तर काय लाभ… हे वाक्य वसईच्या शहरीकरणामुळे बकाल होत चाललेल्या वसईला लागू पडलं. शहरीकरण करून जर वसईला चकाकी  पण नैसर्गिक सौंदर्य गमावलं तर काय लाभ, असं म्हणावं लागेल.