भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची निविदा तिसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वेळी पूर्वीच्या अटी-शर्तीत बदल करून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार ११ नोव्हेंबरनंतर कंत्राटदाराची निवड केली जाणार आहे. मीरा-भाईंदर पालिकेच्या परिवहन सेवेत मोठय़ा ५९, मध्यम १० बस, तर वोल्वोच्या ५ वातानुकूलित अशा एकूण ७४ बस आहेत. या बसगाडय़ा तात्पुरत्या स्वरूपात चालवण्यासाठी पालिकेने एनसीसी आणि  व्हीजीएफ तत्त्वावर एका खासगी कंत्राटी कंपनीला कंत्राट दिले आहे. त्याअंतर्गत कंत्राटदाराला तिकिटाचे पैसे जमा करण्याचे अधिकार देण्यात येतात. मागील काही वर्षांत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता उपलब्ध बसगाडय़ा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या ८ कोटींच्या निधीतून १७ इलेक्ट्रिक बस केंद्र शासनाच्या सूचनेनुसार खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास त्या जीसीसी तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने चालवाव्या लागणार आहे. महासभेत निश्चित केलेल्या धोरणानुसार डिझेल बस एनसीसी आणि व्हिजिएफ तत्त्वावर चालवल्यास दोन वेगवेगळय़ा  कंत्राटदारांत वाद निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिवहन सेवा जीसीसी तत्त्वावर (यात तिकिटे जमा करण्याचे अधिकार पालिकेकडे असतात) चालवण्यात यावी असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी पालिकेने महासभेपुढे सादर केला होता. त्यावर महासभेत इलेक्ट्रिक बस जीसीसी तर डिझेल बस एनसीसी विथ व्हीजीएफ तत्त्वावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पालिकेच्या परिवहन विभागाकडून सेवा जीसीसी तत्त्वावर चालवण्याचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला होता. त्याला नुकतीच मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार ७ ऑक्टोबर रोजी पालिकेने निविदा प्रसिद्ध केली असून त्यास ११ नोव्हेंबपर्यंत मुदत देण्यात आली आहे.  त्यामुळे आता पालिकेला तिकिटातून मिळणारे उत्पन्न प्राप्त होणार आहे. त्यातून कंत्राटदाराला वाहनचालक इंधन खर्च देखभाल दुरुस्ती व तुटीत रक्कम अदा केली जाणार आहे.

Story img Loader