भाईंदर:- मिरा रोड रेल्वे स्थानकावरील वाकड्या झालेल्या रुळावरून रेल्वेगाडी जाण्यापूर्वीच कामगारांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टाळण्यात आली आहे.रुळाखालील दगड कमी झाल्याने रूळ वाकडे झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मिरा रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून रविवारी दुपारी वेगवान मालगाडी जात होती.दरम्यान ही गाडी जात असताना गाडीचे डब्बे हलत असल्याचे बाजूलाच काम करत असलेल्या मजुरांनी पाहिले.त्यामुळे गाडी गेल्यांनंतर मजुरांनी तेथील रूळाची पाहणी केली असताना तेथील रूळ हे वाकडे झाल्याचे दिसून आले.इतक्यात त्याच रेल्वे रुळावरून चर्चेगेटच्या दिशेने दुसरी लोकल गाडी जाणार होती.त्यामुळे मजुरांनी याबाबत रेल्वे पोलिसांना तात्काळ माहिती देऊन ती गाडी वेळेत रोखली.आणि आरपीएफच्या जवानांच्या मदतीने गाडीतील सर्व प्रवाशांना उतरवले.त्यानंतर लोकल गाडी हळूहळू रेल्वे रुळावरून पुढे नेहून पुन्हा प्रवाशांना घेईन निघाली.
मिळालेल्या माहिती नुसार वेगवान गेलेल्या मालगाडीमुळे रुळावरील दगड कमी झाल्याने हा प्रकार घडला.सध्या सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊन रुळाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे प्राधिकरणाचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी दिली आहे.