वसई- मुंबई महानर क्षेत्रातील महापालिकांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना जोरात सुरू असताना वसई विरार शहरातील नागरिक मात्र मागील ४ वर्षांपासून या योजनेबाबत अनभिज्ञ होते. २०२० मध्ये योजना लागू झाली तरी याबाबत कुणाला माहिती नसल्याने शहरात एकही प्रकल्प कार्यान्वित नाही.

झोपडपट्ट्यांचा आहे त्या जागेवर विकास करण्यासाठी राज्य शासनातर्फे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवली जाते. ८ सप्टेंबर २०२० मध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका, ८ नगरपालिका आणि एक ग्रामपंचायतीमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यात नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, वसई विरार. मिरा भाईंदर, उल्हासनगर या ८ महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, अलिबाग, पेण, खोपोली, माथेरान, कर्जत आणि पालघर या ७ नगरपालिकांचा तसेच बोईसर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मात्र वसई विरार मध्ये या योजनेची कुणालाच माहिती नव्हती. त्यामुळे मागील ४ वर्षात एकही प्रकल्प या योजनेअंतर्गत सुरू झालेला नाही.

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टया आहेत. त्यांचा विकास करण्यासाठी एसआरए योजना लागू करण्यासाठी मी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकणाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली तेव्हा योजना २०२० मध्येच लागू असल्याचे समजले, असे वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याशिवाय योजना लागू करणे शक्य नसल्याने प्राधिकरण वसईत येऊ शकले नसल्याचे उत्तर अधिकार्‍यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. योजना २०२० मध्ये आली असती तर एव्हाना अनेक प्रकल्प सुरू झाले असते असे त्या म्हणाल्या. ४ वर्ष वसईत योजना नव्हती त्यामुळे पुढील काळात एसआरए आणि समूह पुर्नविकास (कल्स्टर) योजना अधिक प्रभावीपणे राबिवल्या जाव्या अशी गरज त्यांनी व्यक्त केली. मागील ४ वर्षात योजना का कार्यान्वित करण्यात आली त्याबद्दल मला भाष्य करायचे नाही. परंतु प्रत्येत झोपडपट्टी धारकांना न्याय मिळावा आणि त्यांना या योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळावे अशी अपेक्षा नालासोपारा येथील आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केली.

झोपडपट्टी पुनर्विकास योजना २०२० मध्ये मुंबई महानगर क्षेत्रासाठी लागू झाली आहे. वसईत एकही प्रकल्प कार्यान्वित नाही. त्यामुळे आम्ही वसई विरार शहरात या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्विकास योजना प्राधिकऱणाचे अध्यक्ष पराग सोमण यांनी सांगितले.

Story img Loader