लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या स्नेहा दुबे पंडित यांनी आता बविआच्या वर्चस्वाला शह देण्यास सुरवात केली आहे. पालिकेच्या कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप नसावा असे सांगून त्यांनी अधिकार्यांना सुचक इशारा दिला आहे. हा बहुजन विकास आघाडीला पहिला धक्का दिला मानला जात आहे. त्या माणिकपूर येथे शालेय कला क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
मागील ३५ वर्षे वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते. तीन आमदार व महापालिकेत बविआची एकहाती सत्ता होती. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमात बहुजन विकास आघाडीचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांचे वर्चस्व असायचे. विविध उद्घाटन व अन्य कार्यक्रम ही बविआ कार्यकर्ते यांच्याशिवाय केले जात नव्हते. कार्यक्रम जरी पालिकेचा असला तरी त्यात अन्य राजकीय पक्षांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते. मात्र नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला धक्का देत भाजपच्या स्नेहा दुबे पंडित या निवडून आल्या आहेत. जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी आता बविआला शह देण्यास सुरवात केली आहे.
आणखी वाचा-शहरबात : पर्यटन विकासाच्या घोषणाच
नुकताच माणिकपूर येथील मैदानात वसई विरार महापालिकेच्या शालेय कला क्रीडा महोत्सवाचा उदघाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी वसई विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे- पंडित यांना ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात निवडून आल्यानंतर हा माझा पहिलाच शासकीय कार्यक्रम आहे. महापालिकेचे बजेट हे हजारो कोटींचे आहे. या हजारो कोटींचे बजेट असल्याने यापुढे महापालिकेचा कोणताही कार्यक्रम हा फक्त महापालिकेचा असला पाहिजे. हा कार्यक्रम अराजकीय असावा, त्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा रंग देऊ नये असा सूचक इशारा दुबे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
मात्र या सूचक इशारामुळे ही राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक प्रकारे बहुजन विकास आघाडीला अप्रत्यक्षपणे पहिला धक्का असल्याचे बोलले जात आहे.
आणखी वाचा-भाईंदर : महिलांचा छळ, पालिकेतील दोन कर्मचारी निलंबित; विशाखा समितीचा निर्णय
मॅरेथॉन व कला क्रीडा महोत्सवाकडे ही लक्ष
आता ८ डिसेंबरला महापालिकेची राष्ट्रीय स्तरावरील १२ वी मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे. तर दुसरीकडे डिसेंबर महिन्या अखेर नरवीर चिमाजी अप्पा मैदानात कला क्रीडा महोत्सव ही पार पडणार आहे. या दोन्ही कार्यक्रम महापालिकेच्या मार्फत आयोजित केले जातात.मात्र या कार्यक्रमात बविआचे वर्चस्व असते. स्नेहा दुबे पंडित यांनी दिलेल्या इशार्यानंतर या दोन्ही कार्यक्रमात काय राजकीय नाट्य घडेल त्याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.