लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई- विरार पोलिसांच्या तावडीतून पळालेला कुख्यात चोर मंगेश पार्टे याला अखेर ८ दिवसांनी पकडण्यात गुन्हे शाखा ३ च्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे फरार असतानाही या आरोपीने ३ ठिकाणी चोरी केली होती. त्याला यापूर्वी सख्या भावाच्या हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली होती.
मंगेश उर्फ मनिष यशवंत पार्टे (४८) हा सराईत चोर आहे. ट्रेनमध्ये, मंदिरातून तसेच बाजारून तो लोकांच्या बॅंग चोरण्यात माहिर आहे. ३ ऑक्टोबर रोजी त्याला विरार पोलिसांनी अंबेमाता मंदिरात बॅग चोरी करण्याच्या प्रकरणात अटक केली होती. ५ ऑक्टोबर रोजी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी वसई विरार महापालिकेच्या चंदनसार येथील जीवदानी रुग्णालयात तपासणीसाठी आणले असताना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाच्या हातातवर तुरी देऊन तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेते होते. अखेर गुन्हे शाखा ३ च्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून त्याला शनिवारी रात्री अटक केली आहे.
आणखी वाचा-जागर नवरात्री उत्सवाचा: जूचंद्र गिरीशिखरावरील प्रसिद्ध चंडिका माता
पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतरही पार्टे याने बोरीवली, दादर, आणि पालघर जवळील केळवा या तीन ठिकाणी बॅग चोरीचे गुन्हे केले होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी तो घरी न जाता रस्त्याच्या कडेला झोपायचा. नशेसाठी तो चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत तसेच अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली
भावाचीच केली होती हत्या
आरोपी मंगेश पार्टे याने २००७ मध्ये मालमत्तेच्या वादातून सख्खा भाऊ नितीन पार्टे (३०) याची चाकू भोसकून हत्या केली होती. याप्रकऱणी त्याला अटक केल्यानंतर तो ५ वर्षे तुरुंगात होता. जामिनावर बाहेर येताच त्याने बॅग चोरीचे गुन्हे करण्यास सुरवात केली होती. मुंबई आणि परिसरात त्याने ट्रेनमध्ये बॅग आणि मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत.