लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : हत्या आणि घरफोडी करणार्‍या एका कुख्यात टोळीला मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे. मात्र कारवाईच्या वेळी या टोळीने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात ६ पोलीस जखमी झाले होते. विशेष म्हणजे या टोळीच्या म्होरक्या व्यावासियाकाच्या हत्येप्रकरणात ४ वर्ष तुरूंगात होता. जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा घरफोडी आणि दरोडे घालण्यास सुरवात केली होती.

दरोडेखोरांची एक टोळी विरार जवळच्या शिरसाड येथे पेट्रोलपंप लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा ३ चे पथक कारवाईसाठी गेले. मात्र आरोपींनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, तसेच युवराज वाघमोडे, चेतन निंबाळकर, सचिन घेरे आणि अश्वीन पाटील हे पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. मात्र पोलिसांनी शिताफिने या टोळीला जेरबंद केले. त्यामध्ये टोळीचा म्होरक्या मनिष उर्फ राजू मोहन चव्हाण, रवींद्रसिंग सोलंकी, भाऊसाहेब गवळी, सुखचेन पवार, मॉण्टी उर्फ नंदू चव्हाण तसेच अश्वीनी चव्हाण या महिला आरोपीचा समावेश आहे.

आणखी वाचा-पालिकेतील १२२ कोटींचा ठेकेदार घोटाळा; पाच वर्षांपासून चौकशी रखडली

२०१९ मघ्ये शहापूर येथे हॉटेल व्यावसायिक सुरेश मुनाजे यांची शहापूर येथील बंगल्यात हत्या करण्यात आली होती. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीने ही हत्या केली होती. या प्रकरणाची म्होरक्या मनोज उर्फ राजू चव्हाण यालाल अटक केल्यानंतर तो तुरुंगात होता. सप्टेंबर महिन्यात तो जामिनावर सुटला होता. तेव्हापासून त्याने आपल्या टोळीची जुळवाजुळव करत पुन्हा दरोडे घालण्यास सुरवात केली होती. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत या टोळीने एकूण ५ दरोडे घातले होते. त्यात विरारच्या आगाशी आणि अर्नाळा गावातील घरांवर पडलेल्या दरोड्याचाही समावेश होता. आरोपी हे कुख्यात असून त्यांच्यावर यापूर्वी हत्येचे गुन्हे दाखल आहेत. दरोडे घालताना घरातील सदस्याला जाग आल्यास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार मारले जात होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी दिली.

आणखी वाचा-हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकासही लोकसभेच्या रिंगणात

२ जानेवारी रोजी आरोपींनी गाडी घेतली होती. या गाडीतून ते फिरून रेकी करायचे आणि दरोडे घालत होते. मात्र अवघ्या काही दिवसातच पोलिसांनी त्यांना अटक केली. गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves gang attack on police 6 policemen injured in virar mrj
Show comments