भाईंदर : मीरा रोड येथे सुरु असलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात गर्दीचा गैरफायदा घेत सोनसाखळी चोरांनी महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात-सफाई केली असल्याचे समोर आले. त्यामुळे जवळपास पंचवीसहून अधिक जणांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे.
मीरा रोड येथील एस.के. स्टोन मैदानात बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या त्यांच्या आजच्या कार्यक्रमात साधारण एक लाखाहून अधिक भाविक उपस्थितीत होते.त्यामुळे मैदानात तसेच मैदानाबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते.
याचाच गैरफायदा घेत सोनसाखळी चोरांनी आपली हातसफाई केली.यात प्रामुख्याने महिलांच्या मंगळसूत्राला आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यात आला आहे.त्यामुळे आता पर्यंत पंचवीसहुन अधिक जणांनी याबाबतची तक्रार देण्यासाठी मीरा रोड पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे.तर तक्रारदाराच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर त्यांची नोंद करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मीरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार बागल यांना फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी तो स्वीकारला नाही. मात्र कार्यक्रमात गर्दी होत असल्यामुळे उद्या देखील येणाऱ्या भाविकांनी आपल्या मौल्यवान साहित्याचे रक्षण करावे, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजिका आमदार गीता जैन यांनी केले आहे.