आस्थापनांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षणांसाठी पालिकेच्या नोटिसा
कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागांत अधूनमधून आगी लागण्याच्या घटना समोर येत आहेत. यंदाच्या वर्षी आगी लागण्याच्या घटनांचा आकडा पाचशे पार गेला आहे. काही वेळा गॅसगळती, शॉर्टसर्किट, विद्युत उपकरणांचा स्फोट यामुळे आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत शहरात आगीच्या ५०१ घटना घडल्या आहेत. वाहने, गोदामे, कारखाने, रोहित्र, कचरा दुकाने, मार्केट आणि इतर आस्थापनांचा समावेश आहे. महिन्याला सरासरी ५० ते ५५ घटना या आगीच्या घडत आहेत. यंदा नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कारखान्यात घडलेली स्फोट आग दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी घटना होती. यात चार कामगारांचा मृत्यू झाला होता, तर सहा ते सात कामगार होरपळून जखमी झाले होते.
आगीच्या घटनांना रोखण्यासाठी व अग्निसुरक्षेच्या दृष्टीने पालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील कारखाने आणि इतर आस्थापनांना जवळपास २० हजारांहून अधिक अग्निसुरक्षा लेखापरीक्षण संदर्भात नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. आगी लागण्याच्या घटना या प्रामुख्याने शॉर्टसर्किट यामुळे होत आहेत. प्रत्येक आस्थापनाचे विद्युत लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. तशा सूचनाही केल्या जात आहेत, असे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
वाहनांना आगी
वसई विरार शहरात वाहनांना आगी लागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषत: शॉर्टसर्किट होणे, वाहनांची धडक होऊन आग लागणे अशी विविध कारणे आहेत. काही महिन्यांपूर्वी नालासोपारा येथे दुचाकी वाहनाला आग लागली होती. त्या वेळी एक युवक पेट्रोल टाकी उघडण्याचा प्रयत्न करीत असताना गंभीर जखमी झाला होता. या वर्षी जवळपास ४१ वाहनांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
अग्नितांडव
५० कारखान्यांना आग
४१ वाहनांना आग
५७ विद्युत उपकरणे
३५३ इतर आग घटना