धोकादायक इमारतींचा प्रश्न जटील; पालिकेचे सर्वेक्षण अजूनही अपूर्ण

विरार : वसई-विरार शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होत चालला आहे. त्यात पालिका या इमारतींच्या बाबतीत कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याने हजारो कुटुंबे मृत्यूच्या छायेखाली आहेत. महापालिकेच्या २०१९ च्या आकडेवारीनुसार शहरातील १०४८ इमारतीत ८९४६ कुटुंबे वास्तव्याला होती. ही आकडेवारी मागील दोन वर्षांत वाढली असून सध्या साधारणत: १२ हजारहून अधिक कुटुंब धोकादायक इमारतीत राहत आहेत.

वसई-विरार महानगरपालिकेच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी धोकादायक इमारतीचा आकडा वाढत असतानाही पालिका याबाबत कोणतेही निर्णय घेत नाही. दरवेळी केवळ नोटीस बजावण्याचे काम पालिका करत आहे. त्यानंतर इमारतींचे वर्गीकरण करून पालिका आपली जबाबदारी झटकत आहे. करोनाकाळात या शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण अजूनही पूर्ण झाले नाही. यामुळे शहरातील धोकादायक इमारती अधिक धोकादायक होऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

मागील २०१९ च्या अहवालानुसार वसई-विरार महापालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये तब्बल १०४८ इमारती धोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली होती. त्यातील १९८ इमारती जीर्णावस्थेत म्हणजेच अतिधोकादायक तत्काळ निष्कासित करावयाच्या आहेत. असे असले तरी पालिकेने केवळ १० ते १२ इमारतींवर कारवाई केली आहे. यामुळे या शेकडो इमारती अपघातांना आमंत्रण ठरणार आहेत. तर ३६० इमारती रिकाम्या करून दुरुस्ती करायच्या आहेत. तर ३५२ इमारती रिकामी न करता दुरुस्ती करावयाच्या आहेत.

या सर्व धोकादायक इमारतीत अजूनही या इमारतींमध्ये ६८४० कुटुंबाचे वास्तव्य होते तसेच ७०० हून अधिक दुकाने आहेत. पावसाळ्यात यातील बहुतांश इमारती कोसळून दुर्घटना होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

आसपासच्या इमारतींनासुद्धा धोका

धोकादायक इमारतींना पालिका नोटीस बजावून खाली करण्याचे आदेश देते. पण सध्या करोनाकाळात अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची परिस्थिती नाही. तर आजही अनेक इमारती पालिकेने अतिधोकादायक घोषित करून खाली करायला लावल्या आहेत. पण त्या निष्कासित केल्या नसल्याने अनेक कुटुंबे वर्षांनुवर्षे भाडय़ाने घर घेऊन राहत आहेत. या धोकादायक इमारतीमुळे आसपासच्या इमारतींनासुद्धा धोका निर्माण झाला आहे. यामुळे इतर रहिवाशांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे.

मागील ३ वर्षांपासून पालिका त्यांच्या इमारतींना धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावत आहे. या इमारतीत ४५ कुटुंबे राहत आहेत. पण सध्या वाढते घरांचे दर आणि न परवडणारे भाडे यामुळे येथील रहिवासी इमारत खाली करत नाहीत.

– गणेश कदम, कोपरी परिसर

पालिका इमारती खाली करण्याच्या नोटीस बजावत आहे. या धोकादायक इमारतीत राहणारे नागरिक सामान्य आहेत. त्यांना इतर ठिकाणची घरे घेणे परवडत नाहीत. यामुळे जीव धोक्यात घालून जगत आहेत.

साहिल पाटील, रहिवासी

सदरची इमारत धोकादायक आहे मग महापालिका पाडत का नाही? यामुळे आजूबाजूच्या तीन इमारती धोक्याखाली आहेत. महापालिका आणखी कुणाचा बळी गेल्यावर जागे होणार का?

– प्रकाश कांगणे, रहिवासी

Story img Loader