|| प्रसेनजीत इंगळे

विरार : करोना काळात अनेकांचे नोकऱ्या, रोजगार गेल्यामुळे  अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यातून स्थलांतरित होत आहेत. त्याच बरोबर त्यांची मुले स्थलांतरित होत आहेत. यामुळे मोठा वर्ग शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जात आहे. पालघर शिक्षण विभागाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी करोना काळात केलेल्या सर्वेक्षणात ३ हजार ८६५ मुले जिल्हा, तालुका, तसेच राज्याबाहेर स्थांतरित झाली आहेत. तर १६७२ मुले इतर जिल्ह्यातून, राज्यातून जिल्ह्यात दाखल झाली आहेत.

मागील वर्षापासून राज्यभर करोना वैश्विाक महामारीचा विळखा आहे. यामुळे करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून टाळेबंदी लागू  करण्यात आली होती. या टाळेबंदीने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे रोजगार गिळंकृत केले. यामुळे पोटाची खडगी भरण्याचा प्रश्न उभा राहिला. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला सहन करावा लागला. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोंढेच्या लोंढे हे रोजगारासाठी इतर भागात स्थलांतरित होत आहेत. कुटुंबाच्या जोडीला त्यांची मुलेसुद्धा स्थलांतरित होत असल्याने अनेकांच्या शाळेला रामराम ठोकला जात आहे. डहाणू तालुक्यातून करोना काळात सर्वाधिक १४७४ मुलांचे स्थलांतरण झाले आहे. जव्हारमधून एकही मुलांचे स्थलांतरण झाले नाही. तर वसई तालुक्यातून २३७ मुले स्थलांतरित झाली आहेत. यात १९७४ मुले आणि १८९१ मुली तर ४४८ गरजाधिष्टित मुलांचा समावेश आहे. तालुक्याबाहेर गेलेली एकूण १५८१ मुले गेली आहेत. तर जिल्ह्याबाहेर गेलेली  एकूण मुले १३७७ आहेत. राज्याबाहेर गेलेली एकूण मुले ९०७ आहेत.

याच प्रमाणे जिल्ह्यात इतर विभागातून स्थलांतरित होऊन आलेले विद्यार्थी १६७२ आहेत. तर परजिल्ह्यातून १४१ विद्यार्थी आहेत. तसेच पर राज्यातून ८५ विद्यार्थी स्थलांतरित होऊन आले आहेत.  करोना काळात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांबरोबर स्थलांतरण होत आहे. या संदर्भात माहिती देताना पालघर जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे विषय सहायक पालघर डायसचे तानाजी डावरे यांनी माहिती दिली की, विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांचे स्थलांतरणानंतरचे शिक्षण अहवाल विभागाने ठेवले आहेत. मुख्य कारण कोविड जरी असले तरी इतरही काही कारणाने मुलांचे स्थलांतरण झाले आहे.

Story img Loader