विरार : वसई-विरार महानगरपालिकेने नुकतीच शहरातील वृक्षगणनेची घोषणा केली आहे. असे असताना पालिकेकडून विकासाच्या प्रकल्पात अडथळा ठरणारी वृक्ष तोडण्याचा घाट घातला आहे. बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा महामार्ग रुंदीकरणाच्या कामात बाधित होणारी तीन हजार २६९ झाडे तोडली जाणार आहेत. यासाठी नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. लवकरच शासनाला याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
वसई-विरार महापालिकेने मागील सात वर्षांपूर्वी केलेल्या वृक्षगणनेनुसार पालिकेच्या मालकीची शहरात केवळ चार टक्के वृक्ष आहेत. पालिकेने इतक्या वर्षांत राबविलेले वृक्षारोपणाचे प्रयोग अयशस्वी ठरले आहेत. असे असताना प्रकल्पाच्या नावाने होणारी झाडांची कत्तल यामुळे पर्यावरण धोक्यात येणार असल्याची खंत वृक्षप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पात शिरसाड ते मासवण या पट्टय़ातील रस्त्याच्या विकासकामासाठी १९०६ झाडे बाधित होत आहेत. यात शिरसाड, काशिद कोपर, मांडवी, कोशिंबे आणि चांदिप गावांचा समावेश आहे. तर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात १३६८ झाडे बाधित होत असून त्यात गोखिवरे, बिलाल पाडा, मोरे, ससुनवघर या गावांचा समावेश आहे.
इतक्या मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करताना पालिकेला शासनाची परवानगी घ्यावी लागत असल्याने पालिकेने जाहिरात देऊन नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. मात्र अद्याप कुणीही हरकत नोंदविल्याचे पालिकेच्या अभियंता रंजीत वर्तक यांनी सांगितले आहे. हरकतीनंतर सुनावणी केल्या जातील आणि त्यानंतर शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार झाडांची पूर्ण लागवड केली जाणार आहे. पण पालिकेच्या या निर्णयाला वृक्षप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. पर्यावरण संवर्धन समिती मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले की, हा विकास नसून पर्यावरणाचा ऱ्हास आहे, वाढत्या तापमानाचा पृथ्वीला धोका असताना इतक्या मोठय़ा प्रमाणात झाडे तोडल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. यामुळे पालिकेने याचा पुन्हा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
बाधित होणारी झाडे
पालिकेच्या वतीने वृक्षतज्ज्ञांच्या साहाय्याने या बाधित झाडांची पाहाणी केली आहे. यात २० ते ५० वयोगटातील झाडे असून त्यात प्रामुख्याने आंब्याची ३५६, असुपालव ९९, आवळा २७३, चिंच ११७, इअरलिफ अॅकेशिया १०२, करंज ७०, सुबाभूळ १७९, विलायती चिंच ५०, असाणा १११, साग २९३ याचबरोबर नारळ, ताड, काजू, बदाम, कडुलिंब, पिंपळ, उंबर इत्यादी अनेक झाडांचा समावेश आहे.