वसई: एका तरुणाच्या धमकी आणि छेडछाडीला कंटाळून एक अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली आहे. ‘या मुलाच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करायला जात आहे’, अशी तिने लिहिलेली चिठ्ठी पालकांना सापडली आहे. वसई पोलिसांनी नाशिकमधील एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या शोधासाठी वसई पोलिसांनी ४ पथके तयार केली आहेत.
पीडित मुलगी १७ वर्षांची असून वसई विरार परिसरात राहते. गेल्या काही दिवसांपासून तिला नाशिक येथे रहाणारा एक तरुण त्रास देत होता. माझ्याशी लग्न कर असे सांगून सतत तिला कॉल करून त्रास देत होता. माझ्याशी लग्न नाही केले तर तुझी बदनामी करेल तसेच तुझ्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली होती. यामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली. हा त्रास सहन न झाल्याने तिने बुधवारी रात्री घर सोडले. तिचा सर्वत्र शोध सुरू असताना तिच्या कुटुंबीयांना एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये नाशिक येथे राहणारा मुरलीधर राठोड नावाचा तरुण त्रास देत असून त्याच्या त्रासामुळे आत्महत्या करायला जात असल्याचे लिहून ठेवले होते. यामुळे तिचे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी रात्री २ वाजता वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून वसई पोलिसांनी मुरलीधर राठोड यांच्या विरोधात पाठलाग करणे, विनयभंग करणे आणि धमकी दिल्या प्रकरणी कलम ३५४ (ड) ५०४, ५०६ तसेच बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी येथे राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही या प्रकरणी तपास करत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली.
हेही वाचा – विरारच्या एमबी इस्टेटमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला
मुलीच्या शोधासाठी चार पथके
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वसई पोलिसांनी ४ वेगवेगळी पथके तयार केली आहेत. मुलीला सुरक्षित परत आणणे याला आमचे प्राधान्य असून तपास सुरू असल्याची माहिती एका पथकातील वसई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर यांनी दिली.