वसई : वसईच्या सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावरील सुरूची झाडे नष्ट केल्यानंतर आता भूमाफियांनी येथील तिवरांची झाडे नष्ट करण्यास सुरवात केली आहे. नाल्यात घातक रसायने टाकून ही झाडे नष्ट करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील कांदळवने नष्ट करून जागा हडप करण्याचा भूमाफियांचा डाव असल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे.
वसई विरार मध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहे. शासकीय जागा हडप करून कांदळवने नष्ट केली जात आहे. त्यावर अतिक्रमण करून बांधकामे केली जात आहेत. कांदळवनातील तिवरांच्या झाडे कापून त्यावर माती भराव करून नष्ट करण्यात येत होती. आता मात्र भूमाफियानी कांदळवनातील तिवरांची झाडे नष्ट करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. वसई पश्चिमेच्या सुरूची बाग समुद्र किनार्यागत मोठे कांदळवन आहे. तेथे तिवरांची झाडे आहेत. या जागेवर भूमाफियांचा डोळा आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील तिवरांची झाडे कोमेजून पडल्याचे आढळून आले.
स्थानिकांनी पाहणी केली असता येथील नाल्यात विषारी रसायन टाकल्याचे दिसून आले. या रसायनांमुळेच ही तिवरांची झाडे नष्ट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा प्रकारे रसायन टाकून तिवरांची झाडे नष्ट करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. या प्रकऱणी माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश तलाठी आणि मंडल अधिकार्यांना दिले आहेत, अशी माहिती वसईचे प्रांताधिकारी शेखऱ घाडगे यांनी दिली आहे.
सुरूची बाग उध्दवस्त होण्याचा धोका
वसई पश्चिमेला निसर्गरम्या सुरूची बाग समुद्रकिनारा आहे. येथे असलेली सुरूच्या झाडांमुळे या परिसराला सुरूची बाग समुद्रकिनारा असे नाव देण्यात आले आहे. विस्तिर्ण निळाशार समुद्रकिनारा, सुरूची जाडे यामुळे हा किनारा प्रसिध्द होता आणि येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.मात्र गेल्या काही वर्षाेपासून येथील सुरूची झाडे कापण्यात येत आहे. त्यामुळे बाग ओसाड होऊ लागली आहे. समुद्रकिनार्यावरील वाळू देखील चोरी होत असते. येथील कांदळवनाचा तिवरांची झाडे आहे. तिवरांची झाडे नैसर्गिक धूप प्रतिबंधकाचे काम करतात. विविध पक्ष्यांचे निवासस्थान, जलचर प्राण्यांचे प्रजननस्थान आहे. परंतु आता सुरूच्या झाडांपाठोपाठ तिवरांची झाडे नष्ट केली जात असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महसूल विभाग तसेच पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने वाळू माफिया तसेच भूमाफिया हा किनारा गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामुळे ही सुरूची बाग उध्दवस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.