वसई : उत्तर प्रदेशात राहणार्या २५ वर्षीय तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह वसईच्या पोमण गावात फेकल्याचे एक धक्कादायक प्रकऱण समोर आले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ही हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत मयत तरुणीचा प्रियकर अमित सिंग याला अटक केली आहे.
वसईच्या गिरीज येथे राहणार्या अमित सिंग (२८) या तरुणाचे उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे राहणार्या प्रिया सिंग (२५) या तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. अमित याच्या मालकीच्या वसईत दोन बेकर्या आहेत तर प्रिया ही उच्चशिक्षित आहे. २५ डिसेंबर २०२४ पासून प्रिया ही बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती. प्रियाचा मोबाईल दिल्लीत आढळला होता. परंतु तिचा काही शोध लागत नव्हता. त्यामुळे प्रियाच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते. पोलिसांनी अमित सिंग याच्याकडे दोन वेळा चौकशी दखील केली होती. पण प्रियाला दिल्लीत जाणार्या ट्रेनमध्ये बसवले होते अशी थाप त्याने मारली.
असा लागला छडा..
गोरखपूर जिल्ह्याच्या एम्म पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवांशू सिंग यांनी दिल्लीत तपास केल्यानंतर प्रियाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन काढले असता ते वसईत निघाले. बुधवारी त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांची भेट घेतली आणि मदत मागितली. गुन्हे शाखा- ३ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आदींनी तपास सुरू केला. प्रियकर अमित सिंग याने २५ डिसेंबरलाच प्रियाची हत्या करून तिचा मृतदेह वसई पूर्वेच्या पोमण गावाजवळील निर्जन जागेत फेकून दिला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हस्तगत केला आणि सिंग याला अटक केली.
पुरावा नष्ट करण्यासाठी ‘दृश्यम’ सिनेमाची युक्ती
प्रियाची गळा दाबून हत्या केल्यानंतर अमित सिंग याने पुरावा नष्ट करण्यासाठी गाजलेल्या ‘दृश्यम’ सिनेमाची युक्ती वापरली. त्याने प्रियाचा मोबाईल दिल्लीत जाणार्या ट्रेनमध्ये टाकला. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली आणि पोलीस दिल्लीत तपास करत राहिले होते.
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले की, प्रिया आणि अमित यांचे मागील दिड ते दोन वर्षांपासूनचे प्रेमसंबंध होते. प्रिया लग्नाचा तगदा लावत असल्याने अमित याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने दिला वसईत नाताळ गोठे बघण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करून मृतदेह पोमण गावच्या झुडपात फेकून दिला. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अवघ्या एका दिवसात या प्रकरणाचा छडा लावला.