वसई : टोरेस आर्थिक घोटाळ्यात भाईंदर येथील कंपनीशी निघडीत तिघा जणांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यात शाखेची जागा भाड्याने देणारी महिला तसेच शाखेचा व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकाचा समावेश आहे. आरोपींकडून २६ लाखाची रोखड जप्त करण्यात आली आहे. त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोरेस कंपनीने आठवड्याला ११ टक्के व्याज परतावा देण्याच्या नावावर मिरा भाईंदरसह मुंबई व इतर शहरात गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. भाईंदरच्या रामदेव पार्क येथील शाखा देखील बंद झाली आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी कंपनीच्या तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी व्यवहारासाठी वापरण्यात येणारी कंपनीची दोन बँक खाती गोठवली आहे.

हेही वाचा : दहा वर्षांपासून रखडलेल्या खानिवडे रुग्णालयाच्या कामाला गती, ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय ; १३.३२ कोटींचा खर्च

भाईंदरच्या नवघर पोलिसांनी कंपनीशी संबंधित तिघांना विविध ठिकाणांवरून अटक केली आहे. मिरा रोड च्या रामदेव पार्क येथील कार्यालय भाडेतत्वार देणारी महिला लक्ष्मी यादव हिला ताडदेव येथून अटक करण्यात आली आहे. तर पर्यवेक्षक नितित लाखवानी (४७) आणि व्यवस्थापक कैसर खालिद शेख (५२) यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे रामदेव पार्क येथील शाखेत काम करत होते. यातील व्यवस्थापक आणि रोखपालाकडून जवळपास २६ लाख २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सध्या तिघांनाही शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आली आहे. शुक्रवारी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी रामदेव पार्क येथील शाखेला भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torres investment scam three arrested cash of rupees 26 lakh seized css