वसई : वसईतील पर्यटनस्थळ म्हणून पाणजू बेटाचा विकास केला जाणार होता. मात्र विकासासाठी विविध विभागाच्या लागणाऱ्या परवानग्या व विकास निधी अभावी मागील पाच वर्षांपासून याचा पर्यटन विकास रखडला आहे.

वसई नायगाव खाडी व भाईंदर खाडी यांच्यामध्ये पाणजू बेट परिसर आहे. बेटाच्या सभोवतालचा परिसर हा संपूर्ण समुद्राच्या पाण्याने वेढलेला असून  हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. या भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी याशिवाय वसई तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी वसईच्या पाणजू बेटाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र चार ते पाच वर्षे  होत आली तरीही या बेटाच्या विकासासाठी हालचाली होत नसल्याने या भागाच्या विकासाला खीळ बसली आहे.

पर्यटनस्थळ नीती आयोगाने  पहिल्या टप्प्यात देशातील १ हजार ३८२  बेटांमधुन २६ बेटांची निवड करण्यात आली आहे.  त्या २६  बेटांमधे  वसईतील पाणजू बेटाचा समावेश केला होता. या बेटाचा विकास हा  बेट समग्र विकास (होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ आयलंड्स प्रोग्राम) या अंतर्गत केला जाणार होता.

 यासाठी २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली होती. त्यानुसार अहवाल तयार करून हा भाग विकसित केला जाणार होता. या विकासासाठी जवळपास ९० कोटींचा निधी लागणार आहे. परंतु इतका मोठा निधी जिल्हा स्तरावर उभा करणे कठीण  असल्याने यासाठी केंद्र सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी पालघर जिल्हा नियोजन विभागाकडून करण्यात येत आहे. याशिवाय पाणजू बेटाचा विकास करताना कांदळवन, वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सीआरझेड, कोस्टल अशा विविध विभागांच्या परवानग्या आवश्यक आहेत. परंतु चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटूनही निधी व परवानग्या न मिळाल्याने पाणजू बेटाचा विकास होऊ शकला नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. पाणजू बेटाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे पाणजू ग्रामपंचायतीचे सरपंच आशीष भोईर यांनी सांगितले आहे. 

जिल्हा नियोजनकडून सर्वतोपरी प्रयत्न

पाणजू बेटाचा पर्यटन विकास व्हावा यासाठी निधी याशिवाय विविध विभागाच्या परवानग्या लागणार आहेत. तसेच विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना व त्यात येत असलेल्या अडचणी याचा आढावा घेण्यासाठी नुकताच सर्व विभागाच्या अधिकारम्य़ांची पालघर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.  त्यानुसार अहवाल सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालघर जिल्हा नियोजन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Story img Loader