वसई : पालिकेची बंद पडलेली कचऱ्याची गाडी (कॉम्पॅक्टर) घेऊन जाण्यासाठी टोइंग  गाडी नसल्याने  दुसऱ्या कचरा गाडीने  ओढून नेण्याची वेळ आली  असल्याचा प्रकार समोर आला आहे.  नालासोपारा तुळींज रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. शहरातील जमा होणारा कचरा कचराभूमीवर वाहून नेण्यासाठी कॉम्पॅक्टरची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यात सर्व कचरा जमा करून कचराभूमीवर नेऊन टाकला जात आहे. परंतु शुक्रवारी नालासोपारा पूर्वेतील तुळींज रोडवर कचरा गोळा करण्यासाठी असलेला कॉम्पॅक्टर बंद पडला होता. मात्र बंद पडलेले वाहन  नेण्यासाठी टोइंग गाडी उपलब्ध नसल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बंद गाडी नेण्यासाठी दुसऱ्या एका कचऱ्याचा गाडीने टोइंग करून खेचण्यात येत असल्याचा प्रकार घडला, तर वर्दळीच्या रस्त्यातून ही गाडी खेचत नेत असल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.  पालिकेने केलेल्या या  जुगाडाचा प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात चित्रित  केला असून तो समाजमाध्यमावर चांगलाच वायरल होत आहे.