वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पूल व काशीमिरा जवळील भागात रस्ते रूंदीकरण काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक जटिल बनली आहे. सातत्याने निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबई भाईंदरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, भाईंदर, गुजरात यासह अन्य भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे.
मागील दोन वर्षांपासून या महामार्गावर काँक्रिटीकरण यासह अन्य कामे वेगाने सुरू आहेत.
सद्यस्थितीत भाईंदर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याचे रुंदीकरण करून त्यावर काँक्रिटीकरण केले जात आहे. या कामामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी एक ते दोनच मार्गिका खुल्या राहत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडत आहेत.
विशेषतः ठाणे, वसई विरार , पालघर या भागातून मुंबईकडे जाणारी वाहने अधिक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. काशीमीरा जवळील दिल्ली दरबार होते, फाऊंटन हॉटेल, वर्सोवा पुला अशा ठिकाणी कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत.
मंगळवारी सायंकाळी सुद्धा सहा वाजल्यापासून या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगा जवळपास दोन ते तीन किलोमीटर लांब होत्या अशा त्यातच अवजड वाहने असल्याने वाहतुकीचा वेग ही मंदावला होता असे प्रवाशांनी सांगितले आहे. विकास कामे ही महत्वाची आहेत. मात्र ती करताना त्याचे योग्य ते नियोजन असायला हवे असे नागरिक सागर पाटील यांनी सांगितले.
या वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी काशिमिरा वाहतूक पोलीस व चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलीस यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. काही विरुद्ध दिशेने येणारी वाहने वर्सोवा पुलावरच अडवून कारवाई सुरू केली होती. मात्र वाढत्या वाहनांमुळे पोलीस यंत्रणा ही हतबल झाल्याचे चित्र दिसून आले.
विरुद्ध दिशेने प्रवासामुळे अपघाताचा धोका
वर्सोवा पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्याने बहुतांश वाहनचालकांनी मालजीपाडा, ससूनवघर येथूनच विरुद्ध बाजूने वाहने टाकण्यास सुरवात केली होती. त्यामुळे मुंबईहून वसईकडे जाणाऱ्या वाहनांना ही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच काही ठिकाणी प्राधिकरणाने काम अपूर्ण ठेवले आहे त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आल्याचा दावा
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आलेले रस्त्याच्या काँक्रीटकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जवळपास ९७ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.आता भाईंदर जवळील भागात काम सुरू आहे. कामा दरम्यान दोन लेन खुल्या राहतील असे नियोजन केले जात असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.