लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्रीपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वसई फाटा ते मनोर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत अडकून प्रवाशांचे हाल झाले आहेत.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई व गुजरात ला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. सद्यस्थितीत या महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचे योग्य ते नियोजन न झाल्याने सातत्याने वाहतूक कोंडी व अपघात या सारख्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासूनच महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वसई फाटा, विरार, मनोर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा याचा मोठा फटका बसला.
आणखी वाचा-वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा
एक ते दोन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तीन ते चार तासाचा अवधी लागला असल्याचे प्रवाशांनी सांगितले.महामार्ग प्राधिकरणाकडून शिरसाड, पेल्हार, विरार या भागात काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र त्याचे नियोजन नसल्याने ही वाहतूक कोंडी झाली असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यातच या वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने टाकीत असल्याने दोन्ही वाहिन्यांवर त्याचा परिणाम दिसून आला.
वाहनांचा ओढा वाढल्याने वाहतुकीवर परिणाम
दिवाळीच्या सुट्टीत अनेक गावी व पर्यटन, देव दर्शन यानिमित्ताने बाहेर गेले होते. आता सुट्टी संपत आल्याने अनेक प्रवासी हे परतीच्या मार्गाला लागले आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून महामार्गावर वाहनांचा ओढा हा प्रचंड वाढला आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली आहे.