वसई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज विविध प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने मुंबई ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे ठाणे व मुंबईत जाणाऱ्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल केला आहे. या वाहतूक बदलामुळे शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलापासून ते चिंचोटी या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसई पूर्वेच्या भागांतून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. विविध विभागांना जोडणारा हा महामार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पंतप्रधान मोदी शनिवारी ठाणे, मुंबई या ठिकाणी विविध पायाभूत सुविधांच्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ठाणे व मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल केले आहेत. या बदलाचा फटका कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना बसला आहे. शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
हेही वाचा – बुलेट ट्रेनसाठी वैतरणा खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू
मुंबई ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वर्सोवा पूल ते चिंचोटी या दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे व काँक्रिटीकरणाचे काम यामुळेही वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यामुळे अधिकच वाहतूक कोंडीची समस्या जटील झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे तीन ते चार तास वाहनचालक व प्रवाशांना अडकून राहावे लागले.
हेही वाचा – नागरिकांच्या रोषामुळे क्लस्टर योजनेचे सर्व्हेक्षण थांबवले
नियोजन न केल्याने कोंडी
व्हीआयपी व्यक्तींचे दौरे असतात तेव्हा त्याबाबत सुरुवातीपासून नियोजन केले जाते. वाहतूक मार्गात बदल झाल्याची अधिसूचनाही काढण्यात आली होती. मात्र वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता त्याचे नियोजन योग्यरित्या न झाल्याचे चित्र दिसून येत आहे, असे भूमिपूत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले. अवजड वाहनांना आधीच लांब थांबवायला हवे होते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, रुग्णवाहिका यांचे प्रचंड हाल झाले आहेत. या स्थानिक वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराची तक्रार आता पंतप्रधान यांच्या कार्यालयात करू असेही पाटील यांनी सांगितले.