लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कामण नायगाव उड्डाणपुलाखाली मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ट्रक बंद पडला होता. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या दहा ते बारा किलोमीटर लांब इतक्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई व अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास कामण नायगाव या दरम्यान कंटेनरची ट्रकला धडक लागली. या धडकेत दुभाजक कोसळला व ट्रक ही बंद पडला त्यामुळे अहमदाबाद वाहिनीवरील वाहतूक सेवा विस्कळित झाली होती.

आणखी वाचा-भाईंदर : अल्पवयीन मुलीची रिक्षाचालकाने काढली छेड, नागरिकांनी चोप देत काढली धिंड

त्यामुळे काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने काढली होती. त्याचा परिणाम वसई ते ठाणे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर झाला आणि वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल बनली होती. दोन्ही वाहिन्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. मुंबई वाहिनीवर दहा ते बारा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. दोन ते तीन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

ट्रक अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही मार्गावर ये जा करण्यासाठी केवळ एक एक वाहिनी होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना अडचणी आल्या होत्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on both lanes due to track closure on highway mrj