वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणी झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे झाडांचे नुकसान तर होतेच; परंतु झाडांवर अधिवास करणाऱ्या जिवांना यामुळे धोका उद्भवत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने सर्रासपणे विद्युत रोषणाई करण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत.त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

वसई विरार शहरात झाडांवर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे झाडांचे नुकसान होत आहे. काही दुकानदार व्यावसायिक लाभापोटी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असे प्रकार करीत आहेत. काही ठिकाणी झाडांना खिळे मारून विद्युत तारा टाकल्या जात आहेत. त्याचा झाडांच्या वाढीवर ही परिणाम होत असतो.दुकानाच्या समोरील झाडांना विविध रंगांच्या एलईडी लाईट्स लावल्या जातात. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडत असली तरी झाडांवरील पक्षांचा अधिवास धोक्यात येत आहे.

वसई विरार महापालिकेने शहरातील रस्त्याच्या बाजूला लावली आहेत. या झाडांवर संध्याकाळच्या वेळेस पक्षांचा किलबिल सुरू असते. मात्र दुकादारांकडून झाडांना रोषणाई केल्यामुळे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले आहे.विरार पूर्वेकडील फुलपाडा रोड, मनवेल पाडा रोड, विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज मार्ग, विरार रेल्वे स्थानक मार्ग, जकात नाका बोर्डिंग मार्ग, वसई शंभर फुटी रस्ता नालासोपारा, नायगाव यासह विविध ठिकाणी झाडांना रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळे आता पक्षी झाडांवर घरटी तयार करणे, अंडी घालणे असे प्रकार कमी होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. यासाठी अशा प्रकारे विद्युत रोषणाई करून झाडांचे नुकसान व वन्य जीवांच्या अधिवास धोक्यात आणत आहेत त्यावर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.

झाडांना जाहिरात लावण्याचे प्रकार सुरूच

झाडांवर खिळे मारून व लोखंडी तारा मारून जाहिरात फलक लावण्याचे काम सुरूच असून त्याची संख्येत वाढ होऊ लागली आहे. विविध प्रकारच्या जाहिराती खिळे व स्टेपलर लावून लावल्या जात आहेत. त्यामुळे झाडांना इजापोहचून झाडे मरण पावत आहेत. तर अनेक वृक्षांचे आयुर्मान कमी होऊन ते सुकून जाण्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यासारखे उपक्रम राज्य सरकार व विविध सामाजिक संघटना यांच्या मार्फत राबिविले जात आहेत.जेणेकरून संपूर्ण परिसर हिरवागार राहील परंतु सध्या या जाहिरीताच्या वाढत्या प्रकारामुळे रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या झाडांवर सर्रास पणे खिळे ठोकून जाहिराती लावल्या जातात.

पालिकेचा झाडाचे नैसर्गिक पणा जोपासण्याचा प्रयत्न.

वसई विरार शहरात झाडांना खिळे ठोकणे, जाहिरात फलक लावणे, विद्युत रोषणाई करणे असे प्रकार समोर येत आहेत. त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना वृक्षप्राधिकरण विभागाला दिल्या असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले आहे. झाडांचे नैसर्गिक पणा जो आहे तो जपणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी नवीन वृक्षाची लागवड केली जात आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.