लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई: नालासोपाऱ्यातील ‘तलवार गँग’ प्रकरणात पेल्हार पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ तलवारी, ४ खंजीर, १८ कोयते असा प्राणघातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. एका चित्रफितीमधून या तलवार गँगचा दहशत माजविण्याचा प्रकार समोर आला होता.

३ ऑगस्ट रोजी समाजमाध्यमावर एक चित्रफित प्रसारीत झाली होती. त्यामध्ये नालासोपाऱ्यातील संतोष भुवन परिसरात काही तरूण हातात तलवार घेऊन दहशत माजवत होते. याप्रकरणाने परिसरात घबराट पसरली होती. पेल्हार पोलिसांनी चित्रफितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी साहिल सारवा (२२) आणि विनोद नागर (३२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ तलवारी, ४ खंजीर, १८ कोयते एक बोलेरो पिकअप असा ३ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आणखी वाचा-वर्सोवा पूलावर खड्डे पाहताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संतापले, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

चित्रफितीत तलवार घेऊन फिरणार्‍या आरोपीची ओळख पटली असून तो विधीसंघर्ष बालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा ठावठिकाणा समजला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके गुजराथला रवाना झाल्याची माहिती वऱिष्ठ पोलीस निरीक्षक लब्धे यांनी दिली. आरोपींविरोधात भारतीय हत्यात कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), (३) १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे

Story img Loader