वसई- वसई आणि नालासोपारा मध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.वसई विरार शहरातील तरुणांमध्ये आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी वसई आणि नालासोपारा मध्ये आणि दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पहिली घटना वसई पूर्वेच्या वालीव येथे घडली आहे. वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथे गणेश साहू (१४) हा मुलगा आपल्या कुटुंबियासमवेत रहात होता. रात्री घरात कुणी नसताना त्याने पंख्याला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या का केली त्याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना नालासोपारा येथे घडली. नालासोपारा पूर्वेच्या मोरगाव येथे राहणार्या विष्णू गव्हाणे (१८) या तरुणाने बाथरूमच्या सिलिंगला असलेल्या लोखंडी ॲंगलाल ला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मागील 3 महिन्यात घडलेल्या प्रमुख आत्महत्या
४ एप्रिल २०२५
नालासोपाऱ्यात राहणार्या आर्यन सिंग या २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला मोबाईल गेम खेळण्याची सवय होती. त्याला गेमचे व्यसन लागले आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केली.
३१ मार्च २०२५
विरार मध्ये राहणार्या १२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्पर्श पाटील असे या मुलाचे नाव आहे.
१९ मार्च २०२५
वसईतील श्रेय अग्रवाल या २७ वर्षीय तरुणाने कार्बनमोनोक्साईड वायू प्राशन करून विचित्र पध्दतीने आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून त्याने आपले जीवन संपवले
२७ फेब्रुवारी २०२५
विरारच्या ग्लोबल सिटी येथे राहणाऱ्या उदयकुमार काजवा (५२) याने इसम पत्नी वीणा (४२) तसेच शिवालिका (५) आणि वेदांत (११) या दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली.
९ जानेवारी २०२५
वसईतील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील डॉक्टर डेलिसा परेरा (३९) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
विविध कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.२०२४ या वर्षात मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील तब्बल ४४० जणांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या या गळफास घेऊन करण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षात दिड हजार लोकांनी आपले जीवन संपवले आहे.