भाईंदर :-मिरा भाईंदर शहरातील प्राण्यांवर अंत्यविधीची करण्यासाठी शहरातील दोन स्मशानभूमीत विद्युत दाहिन्याची उभारल्या जात आहेत.  प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी अशाप्रकारे विद्युतदाहिन्यांची सोय करून देणारी मिरा भाईंदर ही राज्याची पहिली महापालिका असल्याचा दावा केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरा भाईंदर शहरात एकूण १६ स्मशानभूमी आहेत. यात अंत्यविधीसाठी पारंपरिक पध्दतीने लाकूड तसेच प्रदूषण रोखण्यासाठी  गॅस आणि  विद्युत दाहिनीची सोय प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे .याशिवाय अंत्यविधीसाठी तीन ठिकाणी दफनभूमी आहेत. परंतु शहरात प्राण्यांवर अंत्यविधी करण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. परिणामी एखादा प्राणी मृत पावल्यास त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत असते. तर पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यावर अंत्यविधी कुठे करावा हा प्रश्न उद्भवत असतो. गेल्या वर्षीच मुंबई मधील एका पाळीव मांजराचा अंत्यविधी भाईंदरच्या स्मशान भूमीत करण्यात आल्याने मोठा वाद उभा राहिला होता.

हे प्रकरण पेटल्यानंतर प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करणार असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार या कामासाठी त्यांनी शासनाकडून निधी मंजुर करत प्राण्याच्या अंत्यविधी साठी विद्युत दाहीन्या खरेदी करण्याच्या सुचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. पालिकेने  निविदा प्रक्रिया राबवून या विद्युत दाहिन्यांची उभारणी करण्याचे काम हाती घेतले आहे. लवकरच या दाहीन्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम करून त्या  वापरात आणणार असल्याची माहिती पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

दोन ठिकाणी विद्युत दाहिनी मिरा भाईंदर महापालिकेने प्राण्यांवर अंत्यविधी करण्यासाठी दोन विद्युत दाहिन्यांची खरेदी केली आहे. यात एक दाहीनी ही नवघर येथील एस.एन कॉलेज जवळ असलेल्या स्मशान भूमीत बसवण्यात आली असून दुसरी ही भाईंदर पश्चिमच्या मोरवा गावातील स्मशान भूमीत बसवली आहे.या दाहीन्याची  किंमत जवळपास तीस लाख इतकी असून हा खर्च शासन निधीतुन करण्यात आला आहे.